संगमनेर Live (राजू नरवडे) | संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील घारगाव येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी मनीषा नवनाथ गाडेकर यांची सर्वांनुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ही निवड प्रक्रिया ग्रामपंचायतीच्या सभागृहात मंगळवार दि. १३ ऑक्टोबर रोजी दुपारी प्रशासनाच्या नियमांचे पालन करून पार पडली.
अध्यादेशीय अधिकारी सरपंच अर्चना आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. तर सचिव म्हणून ग्रामसेवक अशोक बलसाने यांनी काम पाहिले. उपसरपंच पदासाठी मनीषा गाडेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे त्यांची उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
या निवडीनंतर संत्काराला उत्तर देताना नूतन उपसरपंच गाडेकर म्हणाल्या, आमचे मार्गदर्शक शिवसेनेचे तालुका प्रमुख जनार्दन आहेर, आधार स्तंभ सामाजिक कार्यकर्ते नितीन आहेर व सरपंच अर्चना आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माझे सर्व सहकारी व ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. खऱ्या अर्थाने मला आज उपसरपंच पदाची जी संधी मिळाली, त्यामुळे मी भारावून गेली आहे. गावच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच एकोप्याने काम करत आलो आहे. भविष्यातही सरपंच आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाचा रथ पुढे चालूच ठेवू असा निर्धार व्यक्त केला.
सरपंच अर्चना आहेर म्हणाल्या, आज मनीषा गाडेकर या उपसरपंच झाल्या आहेत. त्यामुळे दोन्ही महिला सरपंच व उपसरपंच असल्याने महिलांच्या ज्या अडीअडचणी असतील त्या सर्व सोडवण्यास प्रथम प्राधान्य देऊ. सद्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावासह वाड्या वस्त्यांवर विविध विकास कामे झाली असून काही ठिकाणी कामे सुरूही आहेत. जेवढी विकास कामे करता येतील ती सर्व कामे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नक्कीच आम्ही करणार आहोत. त्यामुळे भविष्यात घारगाव हे विकास कामांचे ’ माॅडेल ’ झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वासही शेवटी त्यांनी व्यक्त केला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.