विजयाचा गुलाल सुकताच नुतन पदाधिकाऱ्याकडून शहराची साफसफाई सुरू!
◻️ सत्तेची सूत्रे हाती येताच नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांनी प्रत्यक्ष कामातून दिला सेवेचा मंत्र
संगमनेर LIVE | लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर नगरपालिकेत मिळवलेल्या दैदिप्यमान यशानंतर, नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी सत्तेचा उन्माद न गाजवता थेट कामाला सुरुवात केली आहे. नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे आणि सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांनी संगमनेर बस स्थानक परिसर आणि नाशिक - पुणे महामार्ग लक्ष्मी रोड परिसरात स्वतः हातात झाडू घेऊन स्वच्छता मोहीम राबवली.
दत्त चरणी आरती करून कामाचा श्रीगणेशा
संगमनेर हायटेक बस स्थानक येथील दत्त मंदिरात महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात व माजी नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही मोहीम सुरू झाली. डॉ. मैथिलीताई तांबे आणि सर्व नगरसेवकांनी दत्ताची आरती करून ‘स्वच्छ संगमनेर'चा संकल्प सोडला.
रात्रीपासूनच कामाचा धडाका!
निवडणुकीचा विजयोत्सव साजरा झाल्यानंतर लगेचच कामाला प्रारंभ करण्यात आला. मागील वर्षभरात फ्लेक्सबाजीमुळे झालेले विद्रुपीकरण आणि साचलेली अस्वच्छता दूर करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली. यामध्ये संगमनेर बस स्थानक ते नाशिक-पुणे रोड (ऑरेंज कॉर्नर) पर्यतचा रस्ता रात्रीचं पाण्याने धुऊन काढण्यात आला. सकाळी दत्त मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, देवी मंदिर आणि हनुमान मंदिर येथे अभिवादन करून प्रत्यक्ष स्वच्छता करण्यात आली.
यावेळी मार्गदर्शन करताना बाळासाहेब थोरात म्हणाले, “संगमनेरला सुसंस्कृत राजकारणाची परंपरा आहे. हे शहर म्हणजे एक कुटुंब आहे. नव्या पदाधिकाऱ्यांनी ही परंपरा पुढे नेत सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर राहावे.” असे म्हणाले.
सौ. दुर्गाताई तांबे म्हणाल्या,“स्वच्छ, सुंदर आणि हरित संगमनेर ही आपली संकल्पना आहे. डॉ. मैथिलीताई आणि त्यांची टीम शहराला देशात अग्रगण्य बनवेल असा मला विश्वास आहे."
नगराध्यक्षा सौ. मैथीली तांबे म्हणाल्या, “जनतेने दिलेला विश्वास ही आमची जबाबदारी आहे. निवडणूक संपली की राजकारण संपते ही आपली संस्कृती आहे. आता सर्वानी एकत्र येऊन शहराच्या विकासासाठी काम करूया.” असे आवाहन केले.
या मोहिमेत दिलीपराव पुंड, विश्वासराव मुर्तडक, सौ. सीमाताई खटाटे, भारत बोराडे, सौ. अर्चना सुभाष दिघे, सौरभ कासार, सौ. शोभाताई पवार, सौ. प्राची काशीद, किशोर पवार, डॉ. अनुराधा सातपुते, सौ. वनिता गाडे, गजेंद्र अभंग, सौ. मालती डाके, नितीन अभंग, सौ. दिपाली पांचारिया, अमजद खान पठाण, डॉ. दानिश खान, किशोर टोकसे, प्रियंका शहा, शैलेश कलंत्री, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, अजित काकडे, सतीश आहेर यांच्यासह अनेक युवक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दरम्यान सत्तेची सूत्रे हाती येताच ‘सेवेचा वारसा’ जपत कामाला सुरुवात केल्याने संगमनेरच्या नवीन टीमने शहरवासीयांची मने जिंकली आहेत.