मेडीव्हिजनचे आठवे राष्ट्रीय अधिवेशन यशस्वीरीत्या संपन्न
◻️अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, डॉ. विखे पाटील फाउंडेशन व मेडीव्हिजनचे राष्ट्रनिर्मितीत योगदान अधोरेखित
संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | “सुदृढ मन - समृद्ध भारत” या संदेशाला अधोरेखित करणारे मेडीव्हिजनचे आठवे राष्ट्रीय अधिवेशन दोन दिवसांच्या यशस्वी वाटचालीनंतर अहिल्यानगर येथे संपन्न झाले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, मेडीव्हिजन आणि डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल, विळद घाट, अहिल्यानगर यांच्या संयुक्त सहकार्याने झालेले हे अधिवेशन देशभरातील वैद्यकीय विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय मंच ठरले.
१३ व १४ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या या परिषदेत ४७३ वैद्यकीय विद्यार्थी प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला. विविध व्याख्याने, कार्यशाळा आणि चर्चासत्रांतून वैद्यकीय शिक्षणासोबतच राष्ट्रहिताचा दृष्टिकोन दृढ करण्याचा प्रयत्न झाला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेतृत्वाखाली गेली अनेक दशके विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर, राष्ट्रहितासाठी व समाजकार्यासाठी संघर्ष करणारी संघटना म्हणून अभावीपची परंपरा या अधिवेशनातूनही अधोरेखित झाली.
समारोप सत्रात डॉ. वीरेंद्रसिंग सोळंकी, देवदत्त जोशी, आशिष चंडेल आणि डॉ. मौलिक ठाक्कर उपस्थित होते. मेडीव्हिजनच्या आयोजकांनी अधिवेशनाच्या यशात मोलाची भूमिका बजावणाऱ्या डॉ. सुजय विखे पाटील यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले. तसेच डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलच्या समर्पित कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.
पहिल्या दिवशी डॉ. नारायणन व्ही, डॉ. अभिनंदन बोकाडिया व डॉ. सुरेश पाटणकर यांची प्रेरणादायी व्याख्याने झाली. विद्यार्थ्याच्या पोस्टर व पेपर सादरीकरणाचे परीक्षण तज्ज्ञ प्राध्यापकांनी केले.
दुसऱ्या दिवशी मानसिक आरोग्य, समृद्ध भारताची संकल्पना, प्रसूतिशास्त्रातील नवकल्पना व डिजिटल दंतचिकित्सा यांवर चर्चासत्रे व कार्यशाळा घेण्यात आल्या. डॉ. प्रशांत साठे यांच्या सत्रातून युवांमधील मानसिक आरोग्य हा राष्ट्रीय स्तरावरील गंभीर विषय चर्चेत आला.
मेडीव्हिजन हा मंच केवळ वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी नाही, तर राष्ट्रहितासाठी समर्पित, सेवाभावी व सजग वैद्यकीय नेतृत्व तयार करण्यासाठी कार्यरत आहे. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या सहकार्यामुळे या अधिवेशनाला यश मिळाले असून, आरोग्यसेवा व शिक्षणातून राष्ट्रनिर्मितीचा आदर्श प्रस्थापित झाला आहे.