अहिल्यानगर जिल्ह्यासाठी रविवारी आणि सोमवारी ‘यलो अलर्ट’

संगमनेर Live
0

अहिल्यानगर जिल्ह्यासाठी रविवार आणि सोमवारी ‘यलो अलर्ट’

◻️ जिल्ह्यातील नागरिकांना विशेष दक्षता घेण्याचे आवाहन 


संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज दि. १४ व उद्या १५ सप्टेंबर २०२५ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यासह पुणे व नाशिक जिल्ह्यांमध्ये वीजांचा कडकडाट, जोरदार वारे व मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच उद्या दि. १६ सप्टेंबर रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

नद्यांच्या विसर्गात वाढ; पूरस्थितीचा धोका..

पुणे, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढला असून त्यामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे. सध्या भिमा नदीवर दौंड पूल येथे ४,३७६ क्युसेक, गोदावरी नदीवरील नांदूर मध्यमेश्वर धरणातून १,६१४ क्युसेक व जायकवाडी धरणातून ५६,५९२ क्युसेक, प्रवरा नदीवरील भंडारदरा धरणातून ८२० क्युसेक व निळवंडे धरणातून ७०० क्युसेक, मुळा धरणातून ५०० क्युसेक तर कुकडी नदीवरील येडगाव धरणातून ७५० क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे.

प्रशासनाकडून नागरिकांना सूचना..

मेघगर्जना होत असताना झाडाखाली, टॉवर, ध्वजांचे खांब किंवा धोकादायक ठिकाणी उभे राहू नये. विद्युत उपकरणांचा वापर टाळावा. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी पाणीपातळी वाढल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. पाण्याने भरलेले पूल ओलांडू नयेत. मोकळ्या जागी असल्यास गुडघ्यावर बसून डोके झाकून घ्यावे. जनावरांचे स्थलांतर सुरक्षित ठिकाणी करावे व शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी नियोजन करावे.

पर्यटनासाठी धरणे, नद्या व धबधब्यांच्या परिसरात जाणे टाळावे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रांमध्ये पाण्याच्या प्रवाहाजवळ जाण्याचे टाळावे. आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय किंवा जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.

दरम्यान जिल्हा नियंत्रण कक्षाचा टोल-फ्री क्रमांक १०७७ असून दूरध्वनी क्रमांक ०२४१-२३२३८४४ व २३५६९४० उपलब्ध आहेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !