उंबरी बाळापूर शिवारात झालेल्या अपघातात आश्वी खुर्द येथील व्यक्तीचा मृत्यू
◻️ आश्वी पंचक्रोशीत हळहळ; सायंकाळी होणार अंत्यसंस्कार
संगमनेर LIVE (आश्वी) | संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर शिवारात सोमवारी झालेल्या चारचाकी वाहनांच्या अपघातात आश्वी खुर्द येथील विकास साहेबराव गायकवाड हे जखमी झाले असून भास्कर बबन मांढरे यांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सोमवार दि. २१ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास आश्वी खुर्द येथील रहिवासी असलेले विकास साहेबराव गायकवाड आणि भास्कर बबन मांढरे (वय - ७५) हे चारचाकी वाहनातून (स्विफ्ट गाडीतून) मनोलीमार्गे संगमनेरच्या दिशेने चालले होते. यावेळी उंबरी बाळापूर शिवारातील मनोली रस्त्यावर असलेल्या अरगडे आणि भुसाळ वस्तीलगत त्यांच्या गाडीचा अपघात झाला.
मोठा आवाज झाल्यामुळे स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोघां जखमींना तात्काळ उपचारासाठी संगमनेर येथील रुग्णालयात पाठवले. या अपघाताचे अधिकृत कारण समोर आले नसले तरी, समोरून येणाऱ्या वाहणाने हुलकावणी दिल्यामुळे हा अपघात झाल्याची परिसरात चर्चा आहे.
जखमींना संगमनेर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता भास्कर मांढरे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर, जखमी विकास गायकवाड यांच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती ठिक आहे.
मयत भास्कर मांढरे यांच्या पश्चात दोन मुले, सुना, दोन मुली, जावई, नातवंडे, एक भाऊ, पुतण्या असा मोठा परिवार आहे. येथील डॉ. दत्तात्रय मांढरे यांचे ते चुलते होते. मांढरे यांच्या मृत्यूची वार्ता कळताचं पंचक्रोशीत हळहळ व्यक्त असून समाज माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.
दरम्यान सायंकाळी शिबलापूर येथील अमरधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.