आईचं ती! लेकरांचा जीव वाचवण्यासाठी बिबट्यामागे पळाली
◻️ शेडगाव येथे चिमुकल्यावर बिबट्याचा प्राणघातक हल्ला
संगमनेर LIVE (आश्वी) | संगमनेर तालुक्यातील शेडगाव येथे गुरुवारी सायंकाळी आई, आजी आणि मामा समवेत घास कापण्यासाठी गेलेल्या चिमुकल्यावर बिबट्याने प्राणघातक हल्ला करत गंभीर जखमी केले. त्यामुळे पंचक्रोशीत मोठी दहशत निर्माण झाली असून दिवसेंदिवस बिबट्याचे हल्ले वाढत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
याबाबत स्थानिकांकडून मिळालेली माहिती अशी की, शेडगाव येथील सेवानिवृत्त ग्रामसेवक लहानु फड यांच्या सुनबाई भारती बंडु फंड या गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास जनावरांना घास कापण्यासाठी प्रवरा नदी किनारी असलेल्या नवीन पुलाशेजारील शेतात गेल्या होत्या. यावेळी त्यांच्या समवेत आई सिंधूबाई नागरे व भाऊ शुभम नागरे यांच्यासह त्यांचा चार ते साडेचार वर्षाचा मुलगा श्रीधर हा त्याच्या शेजारी खेळात होता. तर, झुडपात शिकारीच्या शोधात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक या खेळत असलेल्या चिमुकल्यावर प्राणघातक हल्ला करत त्याला ऊसात उचलून नेले.
त्यामुळे चिमुकल्याला वाचवण्यासाठी आई भारती आणि आजी सिंधूबाई या जिवांच्या आकांताने बिबट्याच्या मागे ऊसाच्या दिशेने पळाल्या. त्यामुळे बिबट्याने त्या चिमुकल्याला जागेवर टाकून झुडपात पलायन केले. मात्र, तोपर्यत चिमुकल्यांच्या मानेवर गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे मामा शुभम याने चिमुकल्याला उपचारासाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.
दरम्यान मुलांच्या मानेवर गंभीर दुखापत झाली असली तरी, सध्या चिमुकल्यावर लोणी येथे उपचार सुरू असून चिमुकल्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते राजू आंधळे यांनी दिली आहे. तर, वारंवार पंचक्रोशीत बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढत असल्याने नागरीकांनी संताप व्यक्त करत वनविभागाकडे या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.