पंचायतराज अभियानात चांगले काम करून बक्षीस मिळवा!
◻️ आमदार अमोल खताळ यांचे तालुक्यातील ग्रामपंचायतीना आवाहन
संगमनेर LIVE | मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे संपूर्ण राज्यात पाच वर्षासाठी राबविले जाणार आहे. या अभियानामध्ये जी ग्रामपंचायत सर्वोत्कृष्ट काम करेल त्या ग्रामपंचायतीचा राज्य, विभागीय जिल्हा व तालुका पातळीवर गौरव होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने या अभियानामध्ये सहभाग घेऊन चांगले काम करून बक्षीस मिळवावे. असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले.
महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायत राज विभाग जिल्हा परिषद अहिल्यानगर आणि पंचायत समिती संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यशाळेचे उद्घाटन आमदार खताळ यांच्या हस्ते झाले. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ, गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, सहाय्यक गट विकास अधिकारी राजेंद्र ठाकूर, कृषी अधिकारी वाळीबा उघडे, बालविकास प्रकल्पाधिकारी निलेश राऊत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता हेमंत चव्हाण, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. कुंडलिक येवले, रिपाइंचे शहराध्यक्ष कैलास कासार यांच्या सह पंचायत समितीचे अधिकारी उपस्थित होते.
आमदार खताळ म्हणाले की, ग्रामपंचायतीने राजकारण हे फक्त निवडणुकां पुरतेच मर्यादित ठेवावे. निवडणुका संपल्या की राजकारण बाजूला ठेवून प्रत्येकाने एकमेकांच्या हातात हात घालून गावाचा सर्वागीण विकास करण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. आपण निधी वाटपात कधीही भेदभाव केला नाही. केंद्रात आणि राज्यात आपल्या विचाराचे सरकार आहे. त्यामुळे निधीची अडचण येणार नाही परंतु, एकमेकांनी हातात हात घालून गावाचा विकास केला तर, गाव नक्कीच समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या जन्मदिवसाचे औचित्य साधत राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरू होणार आहे. या अभियानात प्रत्येक ग्रामपंचायतीने राजकीय गट - तट मतभेद बाजूला ठेवून या अभियानात सहभागी होऊन बक्षीस मिळवले तर, संगमनेर तालुक्याचा निश्चितच संपूर्ण राज्यामध्ये गौरव होईल. यासाठी ग्रामपंचायतीने या अभियानात चांगले काम करावे असा सल्ला आमदार खताळ यांनी दिला.
यावेळी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यामागचा उद्देश संगमनेर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रवीण सिनारे यांनी आपल्या प्रस्ताविकातून मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रप्रमुखबाळासाहेब जाधव व नंदकुमार राहणे यांनी केले तर, आभार सहाय्यक गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर यांनी मानले. यावेळी संगमनेर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी आणि अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
पंचायतराज अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत संगमनेर तालुक्यातील बालविकास प्रकल्पविभागा च्या वतीने पोषण आहारतर्गत अंगणवाडी सेविकांनी बनविलेले विविध खाद्यपदार्थ भाजीपाला फळे कडधान्य यांच्या स्टॉलचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाला आमदार खताळ यांनी भेट देत अंगणवाडी सेविकांच्या उपक्रमाचे कौतुक केले.
मुख्यमंत्री पंचायतराज अभियानामध्ये सहभागी होणाऱ्या ग्रामपंचायतीने फक्त बक्षिस मिळविण्यासाठी या अभियानात सहभाग घेऊ नये . तर, या अभियानाच्या माध्यमातून गावांचा सर्वांगीण विकास कसा होईल आणि खेडे कसे समृद्ध बनेल यासाठी ग्रामपंचायतीनी काम करावे. ग्रामपंचायत च्या सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी आपले गट तट आणि मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन गावाचा सर्वांगीण विकास कसा होईल, यासाठी या अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न करावे. असे जिल्हापरिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ यांनी सांगितले.