आश्वी बुद्रुक येथील भीषण अपघातात एकाचां मृत्यू तर, दुसरा गंभीर जखमी
◻️ मृत्यू झालेली व्यक्ती आश्वी येथील आणि जखमीमध्ये प्रतापपूर येथील व्यक्तीचा समावेश
◻️ रात्री उशीरा अंत्यसंस्कार होणार ; आश्वीसह पंचक्रोशीत शोककळा
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील आश्वी येथील आश्वी बुद्रुक - दाढ बुद्रुक रस्त्यावरील विश्रामगृहा लगत असलेल्या गणपती मंदिरासमोर मंगळवारी दुपारी दोन दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचां मृत्यू तर, दुसरा गंभीर जखमी झाला असल्याची माहिती मिळाली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मंगळवारी (दि. १८) दुपारी ३ वाजण्याचा सुमारास आश्वी बुद्रुक - दाढ बुद्रुक रस्त्यावरील विश्रामगृह लगत असलेल्या गणपती मंदिरासमोर दोन दुचाकीची समोरा - समोर जोरदार धडक झाली.
त्यामुळे या भीषण अपघातात कामानिमित्त हल्ली आश्वी बुद्रुक येथे वास्तव्यास असलेले नितीन किसनराव हिवाळे (वय - ४२) यांचा घटनास्थळीचं दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती स्थानिकानी दिली. तसेच प्रतापपूर येथील सोमनाथ श्रावण बर्डे हा तरूण यामध्ये गंभीर जखमी झाला. जखमी तरुणाला स्थानिकाच्यां मदतीने उपचारासाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताचं आश्वी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी मोठा जनसमुदाय देखील घटनास्थळी उपस्थित होता.
दरम्यान अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या नितीन हिवाळे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन भाऊ व अन्य नातेवाईक असा मोठा परिवार असून आश्वी बुद्रुक येथील सचिन (पप्पू) अमोलिक यांचे ते मेव्हणे होते. त्यांचा अंत्यविधी रात्री उशीरा त्यांच्या मुळगावी श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.