तालुक्याची व्यवस्था बिघडवणाऱ्यांचा बंदोबस्त करा - बाळासाहेब थोरात

संगमनेर Live
0
तालुक्याची व्यवस्था बिघडवणाऱ्यांचा बंदोबस्त करा -  बाळासाहेब थोरात


◻️ सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची ५८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

◻️ निळवंडेसाठी कोणतेही योगदान नसणारे आता जलदूत व्हायला निघालेत

◻️ चाळीस वर्षात तालुका अविश्रांत कामातून उभा केला, संघर्षाचा व कष्टाचा इतिहास विसरू नका


संगमनेर LIVE | एकेकाळी दुष्काळी तालुका ही ओळख होती. मोठ्या कष्टातून आणि संघर्षातून आणि चाळीस वर्षात एकही दिवस सुट्टी न घेता अविश्रांत कामातून समृद्ध आणि वैभवशाली संगमनेर तालुका उभा केला आहे. चाळीस वर्षे शांत आणि विकासाची वाटचाल करणाऱ्या तालुक्यात सध्या काय सुरू आहे याचा प्रत्येकाने विचार करा. तालुक्याची शांतता बिघडवणाऱ्यांचा वेळीच बंदोबस्त करा असे आवाहन करताना तालुक्याला कष्टाचा व संघर्षाचा इतिहास आहे, तो विसरु नका. निळवंडे धरणासाठी ज्यांचे कोणतेही योगदान नाही ते आता जलदूत व्हायला निघाले आहेत. अशी बोचरी टीका कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ५८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजीत तांबे, बाजीराव खेमनर, ॲड. माधवराव कानवडे, सौ. दुर्गाताई तांबे, व्हा. चेअरमन पांडुरंग घुले, रणजितसिंह देशमुख आदी उपस्थित होते.

बाळासाहेब थोरात म्हणाले की, कारखान्याची ५८ वर्षाची वाटचाल ही कौतुकास्पद राहिली आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी माळरानावर सुरू केलेल्या या कारखान्यासाठी डॉ. अण्णासाहेब शिंदे, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक व मान्यवरांची मोठी मदत झाली. ८०० मे. टनापासून सुरू झालेल्या या कारखान्याने ५५०० मे.टन क्षमता व ३० मेगा वॅट वीज निर्मिती सुरू केली. आज आदर्शवत पद्धतीने काम सुरू असून प्रत्येक शेतकऱ्याने एकरी १०० टन उत्पादन काढले पाहिजे.

दुष्काळी तालुका ही संगमनेरची ओळख होती. पाणी चोर म्हणून हिनवले जायचे. सहकारमहर्षी दादांच्या नेतृत्वाखाली मधुकरराव पिचड व आपण पाणी प्रश्नासाठी मोठा संघर्ष केला आणि ३० टक्के हक्काचे पाणी मिळवले. त्यातून पाईपलाईनचे जाळे निर्माण झाले आणि शेती फुलली. दुष्काळी भागाला पाणी मिळावे याकरता निळवंडे धरण हे स्वप्न होते. अनेक अडचणींवर मात करून आपण निळवंडे धरण पूर्ण केले. प्रकल्पग्रस्तांना तालुक्यात जमिनी दिल्या. सहकारी संस्थांमध्ये नोकरी दिल्या. आदर्शवत पुनर्वसन केले. त्यावेळी कुणीही मदत केली नाही. निळवंडे होणार नाही अशा अफवा निर्माण केल्या. मोठ्या कष्टातून निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले ज्यांनी या कामात कोणतीही योगदान दिले नाही ते आता जलदूत व्हायला निघाले आहेत. असा निशाणा त्यांनी नाव घेता साधला.

४० वर्षात एकही सुट्टी न घेता तालुक्याचा सर्वांगीण विकास केला. निळवंडे धरण,कालवे, बायपास, विविध रस्ते, वैभवशाली इमारती, शहरासाठी स्वतंत्र पाईपलाईन योजना, गावोगावी विकास कामे, बंधाऱ्यांचे जाळे, पाणीपुरवठा योजना, आरोग्य, शिक्षण, सहकार, शिक्षण ग्रामीण विकास या सर्व क्षेत्रांमध्ये आपला लौकिक निर्माण झाला आहे. हे काम एका दिवसात झाले नाही. त्यासाठी कष्ट करावे लागले रक्त आटवावे लागले. आज देशात कुठेही गेले तरी अभिमानाने संगमनेरचा उल्लेख होतो. राज्यातही कायम आपला आदर केला जातो. विधानसभा निवडणुकीच्या बाबत अजूनही कुणाला विश्वास नाही अशी परिस्थिती आहे. 

तालुका शांततेने प्रेमाने परिवार म्हणून आपण सांभाळला. मात्र हा विकास काही लोकांना पाहवत नाही येथे अशांतता निर्माण केली जात आहे. खोट्या केसेस टाकल्या जात आहेत. हे काय सुरू आहे असा सवाल करताना नवीन लोकप्रतिनिधी कामाला संधी आहे ते काम करावे तालुक्याची आदर्श परंपरा बिघडू नये किंवा कुणाच्या सांगण्यावरून हत्यार होऊ नये. असे सांगताना मोठ्या कष्टातून हा तालुका उभा झाला आहे. संघर्षाचा इतिहास आहे हा कोणी विसरू नका. आपली चांगल्या राजकारणाची विकासाची परंपरा जपण्यासाठी सर्वानी भक्कमपणे पाठीशी उभे रहा असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संघर्षातून संगमनेर तालुक्याला ३० टक्के हक्काचे पाणी मिळाले. त्यांनीच निळवंडे धरण पूर्ण केले. निळवंडे धरणाचे पाणी ४० टक्के संगमनेर तालुक्याला मिळत आहे. मोठे काम त्यांनी उभे केले आहे कामातून तालुक्याचा राज्यात लौकिक निर्माण केला. आज संगमनेर मॉडेल हे देशभर आदर्शवत म्हणून पाहिले जात आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील सहकारी चळवळीला दिशा देण्यासाठी काम करावे असे नेतृत्व त्यांचे असल्याचे ते म्हणाले.

याप्रसंगी एकरी जास्तीत जास्त उत्पादन करणाऱ्या शेतकरी बांधवांचा कारखान्याच्या वतीने सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. दरम्यान या वार्षिक सर्वसाधारण सभेचे स्वागत व्हा. चेअरमन पांडुरंग घुले यांनी केले. नोटीस वाचन कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. तर, इंद्रजीत थोरात यांनी आभार मानले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !