दलालांना थारा न देता, सर्व सामान्यांपर्यत शासकीय योजना पोहोचवा - आमदार खताळ
◻️ तालुक्यातील १ हजार ५०० बांधकाम कामगारांना गृह उपयोगी साहित्याचे वाटप
◻️ बांधकाम कामगार कार्यालय सुरू झाल्याने आता नगरला जाण्याची गरज नाही
महाराष्ट्र शासन इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या सहकार्याने संगमनेर शहर आणि तालुक्यात सुमारे दिड हजार बांधकाम कामगारांना गृह उपयोगी भांड्यांचे वाटप आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आमदार खताळ बोलत होते. बांधकाम विभागाचे जिल्हा समन्वयक माणिक व्यवहारे यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
आमदार अमोल खताळ पुढे म्हणाले की, संगमनेरमध्ये येथून मागे काय घडलं हे मला माहित नाही. परंतु, ज्या मायबाप जनतेने मला तुमची सेवा करण्याची संधी दिली त्यांना मी विसरणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातू केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ सर्व सामान्यांना मिळवून देणे हे माझं कर्तव्य आहे. शासनाच्या प्रत्येक योजनांचा लाभ खऱ्या लाभार्थ्यापर्यत निशुल्क देणे ही आपली सर्वाची जबाबदारी आहे. ती सर्वानी पार पाडावी असा सल्ला दिला.
त्यांनी पुढे सांगितले की, संगमनेर येथे बांधकाम कामगार कार्यालय सुरू झालेले आहे. त्यामुळे आता बांधकाम कामगारांना अहिल्यानगर येथे जाण्याची गरज नाही. त्या कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यालयात येणाऱ्या बांधकाम कामगारांशी सौजन्याने वागावे अशा आपण सूचना दिल्या. तर, बांधकाम कामगारांनी महायुती कार्यालयाच्या संपर्क कार्यालयात संपर्क साधून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
बांधकाम कामगारांच्या विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती प्रलंबित आहे, याबाबतच्या तक्रारी आपल्याकडे आल्या आहेत. ती शिष्यवृत्ती देण्याचे काम वरिष्ठ स्तरावर होत असते आहे. त्यासाठी पाठ पुरावा केला जाईल. शासनाच्या कुठल्याही योजनेसाठी दलालांना पैसे देऊ नका, महायुती संपर्क कार्यालयाच्या मार्फत विविध शासकीय योजनेचा लाभ मिळवून दिले जात आहे. जे कोणी दलाल बांधकाम कामगारांकडे पैशाची मागणी करत असेल तर त्यांचे नावे मला कळवा. त्या दलालांवर निश्चितच कारवाई केली जाईल, अशी तंबी आमदार खताळ यांनी दिली.