बँका व पतसंस्थांमध्ये १० हजार कोटींच्या ठेवी हे समृद्धीचे प्रतीक - बाळासाहेब थोरात
◻️ अमृतवाहिनी बँकेची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
संगमनेर LIVE | बँकिंग व्यवसाय हा अत्यंत अवघड विषय आहे. तरीही अमृतवाहिनी बँकेने सातत्याने गुणवत्ता राखली असून शेतकरी व गोरगरीब माणसाला मोठी मदत केली आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना अत्यंत अत्याधुनिक सुविधा अमृतवाहिनी बँकेने दिले असून नागरिकांचा मोठा विश्वास या बँकेवर आहे. अनेक दिवसांच्या सातत्यपूर्ण कामातून तालुका उभा राहिला असून आज विविध बँका व पतसंस्था मधून दहा हजार कोटींच्या ठेवी हे समृद्धतेचे प्रतीक असल्याचा अभिमान असल्याचे कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी चेअरमन सुधाकर जोशी होते. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, ॲड. माधवराव कानवडे, सौ. दुर्गाताई तांबे, इंद्रजीत थोरात, लक्ष्मणराव कुटे, पांडुरंग घुले, संपतराव डोंगरे, शंकरराव खेमनर, गणपतराव सांगळे, आर. बी. राहणे, व्हा. चेअरमन ॲड. नानासाहेब शिंदे, संचालक किसन सुपेकर, संजय थोरात, राजेंद्र काजळे, ॲड. लक्ष्मण खेमनर, कचरू फड, शिवाजी जगताप, बापूसाहेब गिरी बाबुराव गुंजाळ, प्रा. विवेक धुमाळ, किसन वाळके, शांताराम फड, अण्णासाहेब शिंदे, सौ. कमल मंडलिक, श्रीमती ललिता दिघे, उबेद शेख, विवेक तांबे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील गुजराथी आदी उपस्थित होते.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकाराचा पाया घातला. आज सर्व सहकारी संस्थांची सुमारे ५० वर्षांची वाटचाल आहे. यामधून ग्रामीण विकास साधला आहे. घरोघरी आर्थिक संपन्नता निर्माण झाली आहे. ही विकासाची वाटचाल आपल्याला जपायची आहे. उभे केलेले वाढवणे आणि टिकविणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
बँकिंग व्यवहार हा अत्यंत अवघड आहे. अमृतवाहिनी बँकेने आधुनिक प्रणालींचा वापर केला असून ग्राहकांना जास्तीत जास्त सुविधा दिल्या आहेत. एक हजार कोटींपेक्षा जास्त ठेवी आज बँकेमध्ये आहे. कर्ज देणे अवघड झाले आहे आणि वसुली सुद्धा अवघड झाली आहे. नागरिकांनी कर्जाचे हप्ते वेळेवर भरले पाहिजे. असे आवाहन करताना अमृतवाहिनी बँकेवर सभासद शेतकरी यांचा मोठा विश्वास राहिला असून भावनेपेक्षा व्यवहार बँकेने जपला आहे.
सहकार शिक्षण ग्रामीण विकास दुग्ध व्यवसाय या सर्वामधून तालुका आज राज्यात अग्रगण्य ठरला असून तालुक्यातील पतसंस्था व विविध बँकांकडून सुमारे दहा हजार कोटींच्या ठेवी आहेत. जगभरातील सर्व बँका नामांकित पतसंस्था फायनान्स कंपन्या संगमनेरमध्ये असून सोन्याची व कापडाची बाजारपेठ मोठी झाली आहे. तालुक्यातील नागरिक मोठे कष्टाळ असून त्यांच्या प्रामाणिकपणा आणि कष्टातून ही प्रगती असल्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले असून ही यशस्वी वाटचाल जपण्याची जबाबदारी प्रत्येकाने घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेचा कारभार प्रशासन अत्यंत उत्तम असून बँकेने राज्य पातळीवर आपला लौकिक निर्माण केला आहे. आगामी काळात ही बँक शेड्युल बँकांमध्ये दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चेअरमन सुधाकर जोशी म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेने नव्याने राहता, निमोण, देवकवठे येथे शाखा सुरू केल्या आहेत. बँकेमध्ये १०५५ कोटींच्या ठेवी असून बँकेने फोन पे, गुगल पे किंवा कोड एटीएम अशा सर्व आधुनिक सुविधा सुरू केल्या आहेत. डीजीटीलायझेशन हे बँकेचे वैशिष्ट्ये राहिले असून आगामी काळात एआयचा वापर आपण करणार आहोत. शेतकऱ्यांसाठी गाय गोठा, पोल्ट्री व्यवसाय याकरता बँकेने कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली असून सर्व प्रकारच्या विमा सुविधा सुरू केल्या आहेत. याचबरोबर सातत्याने विविध शाळांना मदत, वृक्षारोपण अभियान, संगणक वाटप अशा उपक्रमसरु असल्याचे सांगितले.
दरम्यान या वार्षिक सर्वसाधारण सभेचे स्वागत व्हा. चेअरमन नानासाहेब शिंदे यांनी केले. प्रास्ताविक चेअरमन सुधाकर जोशी यांनी केले. नोटीस वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील गुजरातची यांनी तर, बापूसाहेब गिरी यांनी आभार मानले.