श्रमसंस्कार शिबिर म्हणजे सुसंस्काराची पाठशाळा - सौ. शालिनीताई विखे पाटील
◻️ सात्रळ महाविद्यालयाच्या ‘रासेयो’ शिबिराचा तांभेरे येथे उत्साहात समारोप
◻️ १५१ आंबा रोपट्यांचे वाटप करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
संगमनेर LIVE (सात्रळ, समर्थ वाकचौरे) | जिल्हा परिषदेच्या विविध कल्याणकारी योजना आणि ग्रामीण विकासामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) स्वयंसेवकांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. विद्यार्थ्यामध्ये सेवेद्वारे शिक्षण आणि राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करून त्यांना समाजाभिमुख बनविण्याचे कार्य ही योजना करते. खऱ्या अर्थाने श्रमसंस्कार शिबिर म्हणजे सुसंस्काराची पाठशाळा असते, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी केले.
लोकानेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या, सात्रळ येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने तांभेरे (ता. राहुरी) येथे आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या. या शिबिराचे मुख्य सूत्र ‘शाश्वत विकासासाठी युवक : पाणलोट आणि पडीक जमीन व्यवस्थापन’हे होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तांभेरे विविध विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन उत्तम गोविंदराव मुसमाडे होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना सौ. विखे यांनी विद्यार्थ्याशी संवाद साधत अहिल्यानगर जिल्ह्याची सांस्कृतिक ओळख आणि रासेयोच्या बोधचिन्हाबाबत प्रश्नोत्तरे विचारून स्वयंसेवकांना अंतर्मुख केले. विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वागीण विकास साधताना शिक्षकांनी सभोवतालचे पर्यावरण आणि सामान्य ज्ञान यांची सांगड घालणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
याच कार्यक्रमाचे औचित्य साधून संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बलराज पाटील यांच्या संकल्पनेतून १५१ आंब्याच्या रोपट्यांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते स्वयंसेवकांना करण्यात आले.
प्राचार्य डॉ. सोपान शिंगोटे यांनी प्रास्ताविकातून शिबिराच्या उद्देशावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाधिकारी प्रा. संदीप राजभोज यांनी सात दिवसांच्या कार्याचा सविस्तर अहवाल सादर केला, ज्यामध्ये विद्यार्थ्यानी केलेल्या श्रमदानाची आणि ग्रामविकासाच्या कामांची माहिती दिली. ग्रामस्थांच्या वतीने विलास मुसमाडे तर, स्वयंसेवक अक्षदा शिंदे आणि रोशन वाणी या विद्यार्थ्यानी आपले अनुभव व्यक्त केले.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाधिकारी डॉ. विजयकुमार शिंदे, डॉ. प्रतिभा विखे, आदिनाथ माघाडे आणि १२५ स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. डॉ. विजयकुमार शिंदे यांनी आभार मानले, तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. नवनाथ शिंदे व प्रा. दीप्ती आगरकर यांनी केले.
दरम्यान याप्रसंगी सात्रळ महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष ॲड. बाळकृष्ण चोरमुंगे, संस्थेचे संचालक ॲड. आप्पासाहेब दिघे, सदस्य जे. पी. अण्णा जोर्वेकर, रमेश पन्हाळे, सुभाषराव अंत्रे, योगेश चोरमुंगे, राजेंद्र चोरमुंगे, कानडगावचे सरपंच गागरे, तांभेरे गावचे माजी सैनिक मेजर ताराचंद गागरे, सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब बेलकर, श्रीराम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष विलासराव मुसमाडे, सामाजिक कार्यकर्ते सुनील गागरे, बलराज पाटील, संतोष उबाळे, उप प्राचार्या डॉ. जयश्री सिनगर, प्रो. डॉ. रामदास बोरसे, तसेच कार्यकर्ते, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती पत्रकार समर्थ वाकचौरे यांनी कळवली आहे.