संगमनेर तालुक्यातील १८ हजार महिलांना ‘लाडकी बहिण’ योजनेतून वगळले?
◻️ कॉग्रेसच्या अर्चनाताई बालोडे यांच्या दाव्यामुळे खळबळ
संगमनेर LIVE | निवडणुकीच्या रणधुमाळीत गाजलेली ‘लाडकी बहीण' योजना आता संगमनेर तालुक्यात नव्या वादाचे केंद्र ठरली आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकाराने हजारो महिलांना या योजनेचा लाभ मिळाला असला तरी, आता सरकारने अचानक १७ हजार ९६७ महिलांना या योजनेतून वगळल्याचा आरोप महिला कॉग्रेसच्या अध्यक्षा सौ. अर्चनाताई बालोडे यांनी केला आहे. यामुळे तालुक्यातील महिलांमध्ये खळबळ उडाली आहे.
महायुती सरकारने २०२४ मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली होती. संगमनेर तालुक्यातील एकही पात्र महिला या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या ‘यशोधन' जनसंपर्क कार्यालयाने स्वतंत्र यंत्रणा उभी केली होती. रात्रंदिवस काम करून तालुक्यातील सुमारे ९० हजार महिलांचे फॉर्म भरून घेण्यात आले आणि त्यांना लाभही मिळाला. मात्र, आता सरकारने विविध तांत्रिक कारणे पुढे करत सुमारे १८ हजार महिलांची नावे लाभार्थी यादीतून कापल्याचा आरोप करण्यात येत आहे.
यावेळी सरकारवर कडाडून टीका करताना अर्चनाताई बालोडे यांनी म्हटले की, निवडणुकीपूर्वी महिलांना दरमहा २१०० रुपये देण्याचे मोठे आश्वासन देण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात ते आश्वासन हवेतच विरले असून महिलांना मिळणाऱ्या रकमेतही कपात झाली आहे. अनेक पात्र आणि गरजू महिलांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत असून, वारंवार केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही त्यांना बँकेचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, अनेक गरीब महिलांच्या नावापुढे पोर्टलवर चक्क ‘सरकारी नोकरी' असा चुकीचा शेरा मारण्यात आला आहे, ज्यामुळे त्या या लाभापासून वंचित राहत आहेत. केवळ निवडणुकीच्या फायद्यासाठी अशा घोषणा केल्या होत्या का, असा संतप्त सवाल करत सरकारने महिलांची दिशाभूल केल्याचा आरोप बालोडे यांनी केला आहे.
“निवडणुकीपूर्वी २१०० रुपये देण्याचे स्वप्न दाखवले, पण आता आहे ते १५०० रुपयेही मिळेनासे झाले आहेत. आम्ही शेतकरी आणि गरीब असूनही आमच्या नावापुढे ‘सरकारी नोकरी' असा शेरा येतोय, हा आमची थट्टा करण्याचाच प्रकार आहे. सरकारने गरिबांची फसवणूक थांबवावी." असे वडगावपान येथील शेतकरी महिला मीना थोरात यांनी म्हटले.