उंबरी बाळापूर आणि आश्‍वी येथे शनिवारी पहाटे सशस्त्र दरोडा

संगमनेर Live
0
उंबरी बाळापूर आणि आश्‍वी येथे शनिवारी पहाटे सशस्त्र दरोडा

◻️ महिलेच्या कानातील दागिने ओरबाडले; सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास 

संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर आणि आश्‍वी बुद्रुक परिसरात शनिवारी पहाटे सशस्त्र दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडी करून चोरट्यांनी अंदाजे १० ते १५ तोळे सोने आणि सव्वा दोन लाखांची रोख रक्कम लंपास केली आहे. विशेष म्हणजे, दरोडेखोरांनी एका वृध्द महिलेच्या कानातील दागिने बळजबरीने ओरबाडल्यामुळे कानाला गंभीर जखम झाली असून या घटनेने परिसरात एकचं खळबळ उडाली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे १२.३० वाजेच्या सुमारास चोरट्यांनी प्रथम शेडगाव - उंबरी बाळापूर नवीन पुलालगत असलेल्या किसन खेमनर यांच्या ‘हॉटेल बानाई’ला लक्ष्य केले. मात्र, तेथे काही मौल्यवान वस्तू न सापडल्याने चोरट्यांनी चक्क तेथील खाद्यपदार्थावर ताव मारला.

​त्यानंतर चोरट्यांनी जवळच असलेल्या भाऊसाहेब खेमनर यांच्या वस्तीवर मोर्चा वळवला. घरात शिरून उचकापाचक केली. खेमनर कुटुंबांच्या माहितीनुसार अंदाजे २ तोळे सोने, २५ ते ३० हजारांची रोख रक्कम आणि एक मोबाईल चोरट्यांनी लंपास केला. आवाज ऐकून बाहेर आलेल्या हौशीराम (पप्पू) खेमनर यांच्यावर चोरट्यांनी दगडफेक करत तेथून पळ काढला.

​रात्री दीड वाजेच्या सुमारास ही टोळी प्रवरा कालव्यालगत असलेल्या चांगदेव उंबरकर यांच्या घरी पोहोचली. घराचा मागील दरवाजा तोडून आत प्रवेश केलेल्या ३ ते ४ दरोडेखोरांनी तब्बल उंबरकर कुटुंबांच्या म्हणण्यानुसार १० ते १२ तोळे सोने आणि २८ ते ३० हजारांची रोकड चोरट्यांनी पळवली. यावेळी घरातील तरुण जागे झाले असता, दरोडेखोरांनी त्यांच्या गळ्याला कुऱ्हाड आणि कती लावून जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी घरातील वृध्द महिलेच्या कानातील दागिने ओरबाडल्याने त्यांचे कान फाटले आहेत. तर, प्रतिक उंबरकर या तरुणाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर दगडफेक करून चोरटे सामान घेऊन पसार झाले. यावेळी ७ ते ८ चोरटे असल्याचा अंदाज नागरीकांनी व्यक्त केला आहे.

​त्यानंतर, आश्‍वी बुद्रुक शिवारातील मच्छिंद्र होडगर यांच्या घरीही चोरट्यांनी डल्ला मारत ४ ते ५ तोळे सोने आणि १ लाख ७३ हजारांची रोख रक्कम चोरुन नेल्याचे होडगर यांनी सांगितले. तर, घरात चोरी झाल्याचे सकाळी झोपेतून उठल्यानंतर होडगर कुटुंबियांच्या लक्षात आल्याची माहिती समोर आली आहे.

पहाटे या घटनेची माहिती मिळताच आश्‍वी पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे देखील घटनास्थळी आले होते. याप्रसंगी पोलीस पाटील वैशाली भगवान मैड उपस्थित होत्या. तसेच सकाळी पोलीस उपनिरीक्षक दीपक बर्डे, पोलीस हवालदार महेश आहेर यांच्यानंतर डॉग स्कॉडसह मोठा पोलीसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे.

दरम्यान, पोलीस ठाण्यात याबाबत अद्याप गुन्हा दाखल झाला नसून गुन्हा दाखल झाल्यानंतरचं अधिकृत आकडेवारी आणि मुद्देमालाची सविस्तर माहिती समोर येणार आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !