“शेतकऱ्यांच्या डोळ्यात आनंद पाहणे हेच माझ्या जीवनाचे ध्येय”
◻️ प्रकट मुलाखतीतून बाळासाहेब थोरातांनी उलगडला संघर्षाचा आणि विकासाचा प्रवास
संगमनेर LIVE | “तालुक्यातील दुष्काळी भागाला पाणी देऊन प्रत्येक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू फुलवणे, हे केवळ राजकीय आश्वासन नसून माझ्या जीवनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. निळवंडे धरण आणि त्याचे कालवे पूर्ण करण्यासाठी मी अनेक आव्हानांचा सामना केला आणि भविष्यातही संगमनेरच्या सर्वागीण प्रगतीसाठी कटिबद्ध राहीन.” असे प्रतिपादन काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
संगमनेर तालुका युवक काॅग्रेस आणि एनएसयुआयच्या वतीने आयोजित ‘युवा संगम’ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी युवकांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत थोरात यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनापासून ते मंत्रिपदाच्या काळापर्यतच्या अनेक आठवणींना आणि संघर्षाला उजाळा दिला.
बाळासाहेब थोरात यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात संघर्षातून कशी झाली, याचे सविस्तर वर्णन केले. विद्यार्थी दशेत असताना पुण्याच्या लॉ कॉलेजचे जनरल सेक्रेटरी म्हणून काम करताना त्यांना खऱ्या अर्थाने जनसेवेची गोडी लागली. आंदोलन हा स्थायीभाव असल्याने त्यांनी मीटर हटाव, टेंभें आंदोलन आणि मराठवाडा नामांतर आंदोलनासारख्या महत्त्वपूर्ण सामाजिक लढ्यांमध्ये स्वतःला झोकून दिले होते. या जनआंदोलनांमुळे त्यांना ९ दिवसांचा कारावासही भोगावा लागला होता, मात्र त्यातूनच त्यांचा नेतृत्वगुण तावून सुलाखून निघाला.
तालुक्याच्या विकासाचा कणा असलेल्या निळवंडे धरणाबाबत बोलताना त्यांनी अत्यंत भावनिक आठवणी सांगितल्या. १९९२ मध्ये सुरू झालेले हे काम मधल्या काळात रखडले होते. मात्र, १९९९ मध्ये कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची पूर्ण खात्री असतानाही, केवळ निळवंडेचे काम मार्गी लावण्यासाठी त्यांनी स्वतःहून राज्यमंत्रीपद मागून घेतले. अनंत अडचणींवर मात करत २०१२ मध्ये धरणाची भिंत पूर्ण केली आणि आता डाव्या-उजव्या कालव्यांद्वारे प्रत्येक शेतकऱ्याला पाणी देणे हेच आपल्या आयुष्याचे सार्थक असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
संगमनेरच्या आधुनिक ओळखीबद्दल बोलताना त्यांनी विकासाच्या विविध प्रकल्पांचा आढावा घेतला. संगमनेर शहरासाठी राबवलेली थेट पाईपलाईन योजना, तालुक्यातील काकडी विमानतळ आणि नियोजित नाशिक - पुणे रेल्वे हे प्रकल्प तालुक्याच्या प्रगतीचे मानबिंदू आहेत. सध्या रेल्वे मार्गाबाबत काही तांत्रिक अडचणी निर्माण केल्या जात असल्या तरी, हा प्रकल्प नियोजित मार्गानेच पूर्ण होईल, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच, समृद्ध ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शांतता-सुव्यवस्था लाभलेला संगमनेर तालुका हीच आपली खरी ओळख असल्याचे त्यांनी सांगितले.
राजकारणातील सद्यस्थितीवर भाष्य करताना थोरात यांनी वाढत्या जातीयवादावर आणि सूडाच्या राजकारणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, राजकारण हे केवळ सत्तेसाठी नसून गोरगरिबांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी असावे. सत्तेसाठी किंवा तपास यंत्रणांच्या भीतीपोटी विचार बदलणाऱ्यांना इतिहास कधीही माफ करत नाही. “आपली लढाई ही तत्त्वांची असून इतिहास नेहमी लढणाऱ्यांचीच नोंद घेतो,” असा मोलाचा संदेश त्यांनी उपस्थित तरुणांना दिला.
दरम्यान, या कार्यक्रमात बाळासाहेब थोरात यांनी ‘रॅपिड फायर’ प्रश्नांनाही अत्यंत दिलखुलासपणे उत्तरे दिली, ज्यामुळे उपस्थितांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. कार्यक्रमाचे नियोजन आणि आभार प्रदर्शन संगमनेर तालुका युवक काॅग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले. या सोहळ्याला तालुक्यातील युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.