दुर्गापूर येथे चोरीला प्रतिकार करणाऱ्या महिलेला चोरट्यांची बेदम मारहाण

संगमनेर Live
0
दुर्गापूर येथे चोरीला प्रतिकार करणाऱ्या महिलेला चोरट्यांची बेदम मारहाण

◻️​ भरदिवसा चिंचपूर-दुर्गापूर शिवेलगत पुरुष आणि महिलां चोरट्यांचा धुडगूस
संगमनेर LIVE | संगमनेर आणि राहाता तालुक्याच्या सीमेवरील चिंचपूर शिवेलगत असलेल्या दुर्गापूर (ता. राहाता) येथे मंगळवारी दुपारी चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या दोन पुरुष आणि एका महिला चोरट्याने घरातील महिलेला बेदम मारहाण केली. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरल्याने पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मूळ चिंचपूर येथील रहिवासी असलेले गणपत देवराम पारधे यांची दुर्गापूर शिवारात वस्ती आहे. मंगळवारी दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास घरातील महिला जनावरांसाठी चारा कापून घरी परतली. यावेळी त्यांना घरात दोन अनोळखी पुरुष आणि एक महिला घरातील सामानाची उचकापाचक करताना दिसली.

​महिलेने प्रसंगावधान राखत चोरट्यांना जाब विचारला आणि चोरीला विरोध केला. मात्र, चोरी उघड झाल्याच्या रागातून त्या तिन्ही चोरट्यांनी महिलेवर हल्ला चढवला. तिला बेदम मारहाण करण्यात आली. इतकेच नव्हे तर, या तिघां चोरट्यांनी महिलेच्या झोळीतील लहान बाळालाही वेठीस धरून तिला धमकावण्याचा प्रयत्न केला आणि तिथून पळ काढला.

​घटनेची माहिती मिळताच परिसरातून नागरिक मोठ्या संख्येने गोळा झाले. आश्‍वी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट आणि लोणी पोलीस स्टेशनचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शिर्डीचे उपअधीक्षक अमोल भारती यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत तपासाच्या सूचना दिल्या. 

यावेळी चिंचपूरचे पोलीस पाटील अशोक थेटे, पोलीस पाटील दत्तात्रेय तांबे, दुर्गापूरचे पोलीस पाटील दिलीप पुलाटे, गिताराम तांबे, विवेक तांबे यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

दरम्यान, ​आरोपींचा माग काढण्यासाठी श्‍वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. तर, भरदिवसा घडलेल्या या घटनेत नेमका किती ऐवज अथवा मुद्देमाल चोरीला गेला याबाबत अधिकृत माहिती गुन्हा झाल्यानंतरच समोर येणार आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !