संगमनेर तालुक्यात मान्सून पूर्व पावसात वीज पडून अन् भिंत कोसळून दोन मृत्यू
◻️ आमदार अमोल खताळ यांचे पंचनाम्याचे आदेश; मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाखांची मदतीच्या ग्वाही
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यात बुधवारी झालेल्या भीषण मान्सून पूर्व पाऊस आणि वादळी वाऱ्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत केले आहे. या नैसर्गिक आपत्तीत तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दुर्दैवी घटनांमध्ये एका महिलेचा आणि एका वृध्दाचा मृत्यू झाला असून, शेतीपिकांचे व मालमत्तेचेही अतोनात नुकसान झाले आहे.
संगमनेर तालुक्यातील लोहारे येथे सायंकाळच्या सुमारास वीज अंगावर पडल्याने लताबाई कैलास सोनवणे (वय - ४२) यांचा जागीच मृत्यू झाला. दुसरीकडे, डिग्रस येथे वादळामुळे घराची भिंत अंगावर कोसळल्याने महादू माळी (वय ७०) या वृध्दाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुहेरी आघातामुळे संपूर्ण संगमनेर परिसरात शोककळा पसरली आहे.
घटनेची माहिती मिळताच आमदार अमोल खताळ यांनी तातडीने आपत्तीग्रस्त भागाची दखल घेतली. त्यांनी तत्काळ प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधून दोन्ही मृत व्यक्तींच्या कुटुंबांना शासकीय नियमानुसार प्रत्येकी ४ लाख रुपयांची आर्थिक मदत मिळवून देण्याचे निर्देश दिले आहेत. या मदतीसाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
वादळी वाऱ्यामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला असून फळबागा आणि पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
“लोहारे आणि डिग्रस येथील दुर्घटना अत्यंत हृदयद्रावक आहेत. या कठीण प्रसंगात महायुती सरकार शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. मी प्रशासनाला नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत जेणेकरून बाधितांना लवकर मदत मिळेल.” अशी माहिती आमदार आमोल खताळ यांनी दिली आहे.