आश्‍वी परिसराला बुधवारी वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्ण पावसाचा जोरदार तडाखा!

संगमनेर Live
0
आश्‍वी परिसराला बुधवारी वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्ण पावसाचा जोरदार तडाखा!

◻️झाडे उन्मळून पडली, घराचे पत्रे उडाले, कांदा, आंबा फळबागासह वीट भट्ट्याचे मोठे नुकसान

संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील आश्‍वी आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघातील पंचक्रोशीला बुधवारी (दि. १३) सायंकाळी अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातले. मान्सूनपूर्व पावसाच्या या जोरदार हजेरीमुळे शेतकऱ्यांची मोठी दाणादाण उडाली असून, वादळी वाऱ्यामुळे झाडे कोसळून वाहतूक ठप्प झाली. गेल्या दोन दिवसांपासून जाणवणाऱ्या ४१ अंश तापमानाच्या उकाड्यानंतर आलेल्या या पावसामुळे निसर्गाचा रौद्र अवतार पाहायला मिळाला.

​मागील काही दिवसांपासून जिल्ह्याचे तापमान ४१ अंशावर गेल्याने अंगाची लाहीलाही होत होती. मंगळवारप्रमाणेच बुधवारी सकाळपासून प्रचंड उकाडा आणि आर्द्रता जाणवत होती, जणू निसर्ग मोठ्या पावसाची पूर्वसूचनाच देत होता. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला आणि ढगांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. सुमारे दिड तास चाललेल्या या तुफान पावसाने संपूर्ण परिसराला जलमय केले आणि जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले.

​पावसासोबतच वादळी वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, आश्‍वी-दाढ रस्त्यावरील विश्रामगृहाजवळ एक भलेमोठे लिंबाचे झाड उन्मळून रस्त्यावर पडले. यामुळे या मार्गावरील वाहतूक बराच वेळ पूर्णपणे ठप्प झाली होती. त्याचबरोबर आश्‍वी बुद्रुक येथील चावडी जवळील जुन्या लिंबाची मोठी फाटी तुटून थेट मोटर सायकलवर कोसळल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. आश्‍वी खुर्द, उंबरी बाळापूर, शेडगाव, पिंप्री-लौकी अजमपूर, दाढ खुर्द, निमगावजाळी, मांची आदि ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडली आहेत.

आश्‍वी खुर्द येथे विजेचे खांब तुटले असून डीपी देखील कोसळल्याची माहिती मिळाली आहे. परिसरातील ग्रामपंचायत आणि खाजगी घरावरील सोलर पॅनलचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर आश्‍वी बुद्रुक येथील स्टेट बॅक ऑफ इंडिया टॉवर कोसळला. आश्‍विन मुथ्था यांच्या घरासमोरील झाड तसेच ज्ञानदेव ताजणे यांच्या वस्तीवरील तीनशे वर्ष जुने वडाचे कोसळले. तसेच अनिस शेख यांच्या घरावर आणि घराशेजारील उभ्या असलेल्या गाडीवर शंभर वर्ष जुने कोसळल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्याचबरोबर मांची रस्त्यावरील बाबासाहेब बाबासाहेब किसन गायकवाड यांच्या घराचे पत्रे उडाले. सुरेश होडगर यांच्या घरासह गोठ्यावर देखील झाड उन्मळून पडल्याने मोठे नुकसान झाले. तसेच झाडावर वास्तव्यास असलेल्या पक्षांचा देखील यामध्ये मृत्यू झाला आहे. ज्ञानेश्‍वर वाकचौरे यांच्या वीटभट्टीचे देखील मोठे नुकसान झाले असून सुर्यभान जगताप यांच्या घरांचे पत्रे उडाल्याची माहिती मिळाली आहे.

​या अवकाळी पावसाचा फटका काढणीला आलेला आणि शेतात साठवून ठेवलेला कांदा पिकांला बसला आहे. त्याचप्रमाणे वादळी वाऱ्यामुळे आंबा, जांभूळ आणि डाळिंबाच्या फळ बागांचे नुकसान होऊन मोठ्या प्रमाणावर फळगळती झाली आहे. शेतीसोबतच परिसरातील वीटभट्ट्यांचे काम सुरू असल्याने कच्च्या विटांचेही नुकसान झाले आहे. आश्‍वी परिसरातील अनेक दुकानांबाहेर ठेवलेले सामान भिजल्याने आणि काही वस्तूंची पडझड झाल्याने व्यापारी वर्गालाही मोठा आर्थिक फटका बसला आहे. पाऊस सुरू होताच वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना प्रचंड उकाडा आणि अंधार अशा दुहेरी मनस्तापाचा सामना करावा लागला आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !