‘डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळेच रस्त्यांची कामे रखडली’ डॉ. विखे पाटील विधानावर ठाम!
◻️ ‘दारू'च्या विधानावर दिलगिरी ; नगर-मनमाड महामार्गावरून विरोधकांचा समाचार
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमुळे आणि युध्दजन्य परिस्थितीमुळेच देशातील व पर्यायाने नगर-मनमाड महामार्गाची कामे रखडली आहेत, या आपल्या आधीच्या विधानावर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पुन्हा एकदा ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे.
“मी प्रत्येक वाक्य पूर्ण अभ्यास करून बोलतो, विरोधकांनी आधी जागतिक घडामोडींचा अभ्यास करावा,” असा टोला त्यांनी लगावला. मात्र, याच वेळी दारू पिणाऱ्यांच्या संदर्भात केलेले मिश्किल विधान मागे घेत असल्याचे त्यांनी शिर्डी येथील पत्रकार परिषदेत जाहीर केले.
आपल्या विधानाचे समर्थन करताना डॉ. विखे यांनी आकडेवारीचा दाखला दिला. ते म्हणाले की, “अमेरिकेच्या युध्द धोरणामुळे पश्चिम आशियातून डांबराचा पुरवठा घटला. भारताला दरवर्षी सुमारे ९० लाख मेट्रिक टन डांबराची गरज भासते. निम्मी गरज देशांतर्गत पूर्ण होते, तर उर्वरित डांबर इराक, इराण, युएई मधून आयात केले जाते. युध्दजन्य परिस्थितीमुळे आयातीत तब्बल ७८ टक्क्यांची घट झाली आहे.” असे सांगितले.
फेब्रुवारी महिन्यात प्रती मेट्रिक टन सुमारे ४८ हजार रुपये असलेला डांबराचा दर काही महिन्यांत वाढून थेट ८३,६५२ रुपयांवर पोहोचला. दरात सुमारे ७१ टक्क्यांची वाढ झाल्याने देशातील अनेक रस्त्यांची कामे थांबली आणि त्याचाच फटका अहिल्यानगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गालाही बसल्याचे त्यांनी सप्रमाण स्पष्ट केले. याबाबत केंद्र सरकारने कंत्राटदारांना वाढीव दर देण्यासंदर्भात केलेल्या पत्रव्यवहाराचे पुरावेही त्यांनी सादर केले.
रस्त्याच्या प्रश्नावर बोलताना ‘दारू पिणाऱ्यांची संख्या वाढली’ असे विधान डॉ. विखे यांनी केले होते. यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. यावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, “माझे ते विधान मार्मिक आणि मिश्किल होते. त्याचा राजकीय पोळी भाजण्यासाठी विपर्यास करण्यात आला. तरीही यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी दिलगिरी व्यक्त करून ते शब्द मागे घेत आहे.” असे स्पष्ट केले.
नगर-मनमाड महामार्गाच्या दुरवस्थेवरून सुरू असलेल्या टीकेला उत्तर देताना त्यांनी राहात्यातील नेत्यांवर थेट हल्लाबोल केला. “काही नेते ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्यासाठी केंद्राला चार-चार पानी पत्रे पाठवत आहेत. रस्त्याच्या कामात दिरंगाई झाली आहे, रस्ता खचला आहे हे मी मान्य करतो. ठेकेदार माझा नातेवाईक नाही. पण त्याच्यावर कारवाई होऊन तो काम सोडून गेला, तर उर्वरित रस्ता हे नेते स्वतः पूर्ण करणार आहेत का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. काम थांबवण्यापेक्षा ते पूर्ण करून घेण्याला प्राधान्य दिले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
“निवडणुकीत पराभूत झाल्याने कोणी संपत नाही. जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी हात वर केल्यामुळे मला रस्त्यावर उतरावे लागत आहे. रस्त्यासाठी आवाज उठवायला ग्रामपंचायत सदस्य असण्याची गरज नाही. मी या देशाचा करदाता नागरिक आहे, या रस्त्यावर अपघातात जीव गमावणारे नागरिक माझे आहेत. त्यामुळे एक जबाबदार नागरिक म्हणून मला प्रश्न विचारण्याचा आणि काम पूर्ण करून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे,” असे विखे यांनी ठणकावून सांगितले.
सध्या नगर-मनमाड रस्त्याचे जवळपास ६० टक्के काम पूर्ण झाले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या प्रकल्पाला गती देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, “एका पराभवाने काहीही संपत नाही, २०२९ च्या निवडणुकीत लागणारा निकाल सर्वांसमोर असेल,” असा विश्वासही त्यांनी शेवटी व्यक्त केला.