जुन्नरमधील घटना माणुसकीला काळिमा फासणारी - बाळासाहेब थोरात
◻️ नराधमावर फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवून कठोर कारवाई कारवाईची केली मागणी
संगमनेर LIVE | पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे एका साडेनऊ वर्षांच्या निष्पाप चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी या अमानुष कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. ही घटना अत्यंत संतापजनक, दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी असल्याची उद्विग्न प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
या गंभीर घटनेवर बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, “जुन्नर येथील पिंपळवंडीमध्ये घडलेली ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. मी या अमानुष आणि विकृत कृत्याचा अत्यंत तीव्र शब्दांत निषेध करतो. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल, निष्पक्ष आणि जलद गतीने चौकशी केली पाहिजे. तसेच, हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात (जलदगती न्यायालयात) चालवून दोषी नराधमाला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून त्या निष्पाप चिमुकलीला आणि तिच्या कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळेल.”
समाजात वाढणाऱ्या अशा विकृत प्रवृत्तींवर चिंता व्यक्त करताना थोरात यांनी प्रशासन आणि सरकारच्या भूमिकेवरही लक्ष वेधले. ते म्हणाले की, “केवळ कायदे असणे पुरेसे नाही, तर अशा अमानुष घटनांना आळा घालण्यासाठी कायद्यांची प्रभावी आणि तत्पर अंमलबजावणी होणे ही काळाची गरज बनली आहे. राज्यातील प्रत्येक मुलगी आणि महिला निर्भयपणे व सुरक्षित राहील, यासाठी शासन आणि प्रशासनाने केवळ आश्वासने न देता तातडीने ठोस पावले उचलली पाहिजेत.” असे म्हटले.
दरम्यान, या संतापजनक घटनेनंतर जनमानसातही तीव्र रोष पाहायला मिळत असून, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी सर्व स्तरातून जोर धरू लागली आहे.