युवा व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ‘मिनी ट्रॅक्टर’ला अनुदान द्या!
◻️ आमदार अमोल खताळ यांची कृषिमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | कृषी विभागाच्या ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत महाडीबीटी पोर्टलवर राबविण्यात येणाऱ्या कृषी यांत्रिकीकरण योजनेत १८ ते २० एचपी क्षमतेच्या लहान ट्रॅक्टरसाठी (मिनी ट्रॅक्टर) अनुदानाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी आग्रही मागणी आमदार अमोल खताळ यांनी केली आहे. युवा शेतकऱ्यांच्या या मागणीची दखल घेत आमदार खताळ यांनी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले असून, यावर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली आहे.
सध्या शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत आहे. विशेषतः सुशिक्षित युवा वर्ग मोठ्या संख्येने शेतीकडे वळत आहे. अल्पभूधारक आणि लघु शेतकऱ्यांना शेतीची मशागत, पेरणी, फवारणी, आंतरमशागत यांसारखी कामे वेळेत आणि कमी खर्चात करण्यासाठी १८ ते २० एचपी क्षमतेचे लहान ट्रॅक्टर अत्यंत सोयीस्कर ठरतात.
मात्र, सध्या महाडीबीटी पोर्टलवरील कृषी यांत्रिकीकरण योजनेचे निकष जाचक असल्याने, अनेक गरजू शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या आकारमानानुसार लहान क्षमतेचा ट्रॅक्टर घेताना अनुदानाचा लाभ मिळत नाही. परिणामी, शेतकऱ्यांची मोठी अडचण होत असल्याचे समोर आले आहे.
आमदार अमोल खताळ यांनी या समस्येकडे कृषिमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या या मागणीचा गांभीर्याने विचार करून महाडीबीटी पोर्टलवरील योजनेच्या निकषांमध्ये आवश्यक ते बदल करावेत, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. १८ ते २० एचपी ट्रॅक्टरसाठी अनुदानाची सुविधा लागू केल्यास कमी जमीन असणाऱ्या आणि आधुनिक शेती करू पाहणाऱ्या युवा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल.
दरम्यान, पात्र युवा शेतकऱ्यांना या योजनेचा त्वरित लाभ मिळण्यासाठी शासनाने तातडीने नवा शासन निर्णय (जीआर) काढून कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार खताळ यांनी कृषिमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.