नगर-मनमाड महामार्गावरून काॅग्रेसचे थेट डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र!

संगमनेर Live
0
नगर-मनमाड महामार्गावरून काॅग्रेसचे थेट डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र!

डॉ. विखेच्या विधानाचा संदर्भ देत ‘ट्रम्प तात्याकडे डांबर पाठवण्याची मागणी


संगमनेर LIVE (​शिर्डी) | रखडलेल्या नगर-मनमाड महामार्गाच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी राहाता तालुका काॅग्रेस कमिटीने थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना साकडे घातले आहे. भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी अलीकडेच केलेल्या एका विधानाचा संदर्भ देत काॅग्रेसने ‘डोनाल्ड ट्रम्प उर्फ ट्रम्प तात्यां'च्या नावाने थेट व्हाईट हाऊसच्या पत्त्यावर एक उपरोधिक पत्र पाठवले आहे. 

​काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी नगर-मनमाड महामार्गाच्या प्रश्नावर बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांचा संदर्भ दिला होता. तसेच, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिक त्रस्त होऊन अधिक प्रमाणात दारू प्यायला लागल्याचेही त्यांनी म्हटले होते. याच विधानाचा धागा पकडून राहाता तालुका काॅग्रेसचे अध्यक्ष सचिन चौगुले यांच्या नेतृत्वाखाली हे उपरोधिक आंदोलन करण्यात आले.

काॅग्रेसने या पत्रात अतिशय मार्मिक शब्दांत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. पत्रात म्हटले आहे की, “आम्हाला आतापर्यंत वाटत होते की, या रस्त्याच्या दुरवस्थेला इथले मंत्री, आमदार, खासदार, अधिकारी आणि ठेकेदार जबाबदार आहेत. मात्र, डॉ. सुजय विखे यांच्या विधानानंतर या रस्त्याला डोनाल्ड ट्रम्पच जबाबदार असल्याचे आम्हाला नव्याने समजले.” असे नमूद केले.

रखडलेले काम, वाढते अपघात आणि साईभक्तांना होणाऱ्या त्रासाचा पाढा या पत्रात वाचण्यात आला आहे. तसेच, विखेंच्या विधानाचा संदर्भ देत काॅग्रेसने ट्रम्प यांनाच उपरोधिक आवाहन केले आहे. “ट्रम्प तात्या, रस्त्यासाठी लवकरात लवकर डांबर उपलब्ध करून द्या. रस्ता पूर्ण झाला तर नागरिकांचा त्रास कमी होईल आणि मुख्य म्हणजे त्यांचे दारू पिण्याचे प्रमाणही कमी होईल,” असा बोचरा टीकाही यातून करण्यात आली आहे.

दरम्यान, ​हे पत्र शिर्डी डाकघरातून टपाल पेटीत टाकण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष सचिन चौगुले यांच्यासह संदीप तारडे, सचिन बनसोडे, योहान गायकवाड, सूरज गायकवाड, संदीप शेजवळ, संतोष वाघमारे आणि मतीन शेख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !