बाभळेश्‍वर कृषी विज्ञान केंद्राच्या रोपवाटिकेला राष्ट्रीय ‘टू-स्टार' मानांकन!

संगमनेर Live
0
बाभळेश्‍वर कृषी विज्ञान केंद्राच्या रोपवाटिकेला राष्ट्रीय ‘टू-स्टार' मानांकन!

◻️ ​दर्जेदार रोपांच्या निर्मितीवर राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाची मोहोर

संगमनेर LIVE (​लोणी) | स्थानिक शेतकऱ्यांना दर्जेदार रोपे आणि अद्ययावत कृषी तंत्रज्ञान पुरविणाऱ्या बाभळेश्‍वर येथील ‘पायरेन्स’ संचलित कृषी विज्ञान केंद्राच्या (केव्हीके) रोपवाटिकेतील उत्कृष्ट कार्याची दखल घेत, राष्ट्रीय फलोत्पादन (बागवानी) मंडळाकडून या रोपवाटिकेला २०२६-२७ ते २०२७-२८ या कालावधीसाठी प्रतिष्ठेचे ‘टू स्टार’ मानांकन जाहीर झाले आहे. केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. शैलेश देशमुख यांनी ही माहिती दिली.

​देशभरातील रोपवाटिकांचे व्यवस्थापन, रोपांची गुणवत्ता, निर्मितीमधील शास्त्रीय पध्दतींचा वापर आणि शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सेवांचे राष्ट्रीय बागवानी मंडळाकडून सखोल मूल्यांकन केले जाते. या सर्व निकषांवर उच्च दर्जाचे मापदंड प्रस्थापित केल्यामुळे बाभळेश्‍वर केव्हीकेला हे मानांकन प्राप्त झाले आहे.

या रोपवाटिकेत पूर्णतः शास्त्रीय पध्दतीने फळझाडे, भाजीपाला व फुलशेतीची रोपे तयार केली जातात. यामध्ये प्रामुख्याने आंब्याचे ‘केशर’, पेरूचे ‘सरदार', डाळिंबाचे ‘भगवा', शेवग्याचे ‘पीकेएम-१' आणि अंजिराचे ‘दिनकर' यांसारख्या विविध दर्जेदार वाणांच्या रोपांची निर्मिती केली जाते.

याविषयी अधिक माहिती देताना उद्यान विद्या विभागाचे प्रमुख डॉ. विलास घुले म्हणाले की, “गेल्या अनेक वर्षांपासून ही रोपवाटिका शेतकऱ्यांच्या सेवेत आहे. या राष्ट्रीय मानांकनामुळे रोपवाटिकेच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब झाले असून, शेतकऱ्यांचा विश्‍वास अधिक दृढ होईल. याठिकाणी शेतकऱ्यांना केवळ दर्जेदार रोपेच मिळत नाहीत, तर फळबागेचे उत्पादन तंत्र आणि लागवड पध्दतीविषयी मोफत मार्गदर्शनही दिले जाते.”

या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना कृषी विज्ञान केंद्राचे संचालक डॉ. उत्तमराव कदम म्हणाले की, “बाभळेश्‍वरचे कृषी विज्ञान केंद्र केंद्र व राज्य सरकारच्या योजना राबवण्यात नेहमीच आघाडीवर असते. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा संस्थेचे अध्यक्ष नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कृषी क्षेत्रातील दृष्टिकोन समोर ठेवून हे केंद्र काम करत आहे.”

​संस्थेचे अध्यक्ष विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुप्रिया ढोकणे पाटील आणि सचिव डॉ. निलेश बनकर यांच्या पाठबळामुळे केंद्राच्या विविध उपक्रमांना सातत्याने बळ मिळत असल्याचेही डॉ. कदम यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, ​या मानांकनामुळे प्रवरा परिसरातील बागायती शेतीला मोठी चालना मिळणार असून, दर्जेदार व खात्रीशीर रोपांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन क्षमतेत लक्षणीय वाढ होण्यास देखील मदत होणार आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !