‘पुढे कुत्रा, मागे मांजर अन् त्यांच्या मागे बिबट्या’ थरारक घटना सीसीटीव्हीत कैद!
◻️ सादतपूर शिवारात वनविभागाकडून पिंजरा लावण्याची प्रक्रिया सुरू
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | संगमनेर तालुक्यातील सादतपूर शिवारात सोमवारी सायंकाळी एक अत्यंत थरारक घटना समोर आली आहे. रस्त्यावरून पुढे कुत्रा, त्याच्या मागोमाग मांजर आणि थेट तिच्याच मागे शिकारीसाठी धावणारा बिबट्या... असा अंगावर काटा आणणारा दृश्यपट या ठिकाणी उपस्थितांनी अनुभवला. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार नजीकच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भिती पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सादतपूर (ता. संगमनेर) शिवारातील भुतेश्वर फाटा येथील मगर वस्ती येथे कामगार पोलीस पाटील सुनील अप्पासाहेब मगर यांची गट नंबर २१४ मध्ये वस्ती आहे. सोमवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास उजेडातचं शिकारीच्या शोधात आलेला एक बिबट्या अचानक अवतरला. बिबट्याने शिकारीसाठी समोर दिसलेल्या मांजरीचा आणि कुत्र्याचा पाठलाग सुरू केला.
‘पुढे कुत्रा, मागे मांजर आणि सर्वात मागे बिबट्या’ असा हा जीवघेणा पाठलाग सुरू असतानाच, प्रा. सुभाष मगर यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता मोठ्याने आरडाओरडा केला. प्रा. मगर यांच्या प्रसंगावधनामुळे आणि मोठ्या आवाजामुळे बिबट्याने जवळच्या शेतात पलायन केले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
हा संपूर्ण थरारक प्रकार वस्तीवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने पसरला असून, तो पाहून नागरिकांच्या अंगावर काटा येत आहे. उजेड असतानाच बिबट्याने मानवी वस्तीजवळ येऊन असा पाठलाग केल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वनविभागाने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ याठिकाणी पिंजरा लावण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे सायंकाळी कुत्रा वाचला असला तरी, बिबट्याने मात्र, मध्यरात्री त्याचं कुत्र्याचा फडशा पाडल्याची माहिती मिळाली आहे.