स्वातंत्र्यदिनी प्रवरेत पोलीस व सैन्य दलातील माजी विद्यार्थ्यांचा गौरव
◻️ आश्वी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना पदवी, रोजगार आणि संस्काराची मेजवानी - प्राचार्य
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील कला, वाणिज्य, विज्ञान व बीसीएस महाविद्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात संस्थेचे ज्येष्ठ संचालक अण्णासाहेब भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य देविदास दाभाडे म्हणाले, “आमच्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान किंवा पदवी देण्यापुरते मर्यादित न ठेवता, त्यांच्यात आत्मविश्वास विविध कौशल्ये आणि जीवनात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याचे कार्य केले जाते. याच योग्य मार्गदर्शनाच्या आणि मेहनतीच्या बळावर आज या महाविद्यातील विद्यार्थ्यांनी पोलीस दल, भारतीय सैन्य दल, विविध नामांकित कंपन्या तसेच शासकीय व खासगी क्षेत्रांत नोकरी मिळवून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या यशाचा संपूर्ण महाविद्यालयाला सार्थ अभिमान आहे.” असे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अण्णासाहेब भोसले यांनी आपल्या भाषणात नमूद केले की, महाविद्यालयातील गुणवत्तेचे शिक्षण, प्राध्यापकांचे योग्य मार्गदर्शन, शिस्तबध्द वातावरण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवले जाणारे विविध उपक्रम यांचा विद्यार्थ्यांच्या या यशस्वी प्रवासात अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे.
याप्रसंगी भारतीय सैन्य दल व पोलीस दलात दाखल होऊन आपल्या उत्कृष्ट कर्तृत्वाने महाविद्यालयाचे आणि परिसराचे नाव उज्ज्वल करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये मीना घुगे, सविता घुगे, प्रमिला गोडगे, संजय मुंढे, कैलास जोरी, गोकुळ कापडी, गणेश आव्हाड, सुदर्शन सानप आणि संजय सांगळे या माजी विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा गौरव करण्यात आला.
दरम्यान, या सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रा. प्राजक्ता खळदकर व प्रा. वर्षा गायकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ. आदिनाथ घोलप यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.