प्रामाणिकपणे काम करणे हीच खरी देशसेवा - डॉ. शैलेंद्रसिंह होडगर
◻️ मांचीहिल शैक्षणिक संकुलात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. तसेच घरादारावर तुळशीपत्र ठेवून लढा दिला. त्यांच्या या महान बलिदानामुळेच आज आपण स्वातंत्र्याचा अनुभव घेत आहोत. मात्र, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मिळालेल्या अधिकारांचा उपयोग लोकाभिमुख आणि समाजहिताच्या कामांसाठी करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आपल्या वाट्याला आलेले काम अतिशय चोख, प्रामाणिक आणि उच्च दर्जाचे करणे हीसुध्दा एक प्रकारची देशसेवाच आहे, ती सर्वानी अंगीकारावी. असे आवाहन मांचीहिल शैक्षणिक संकुलाचे विश्वस्त डॉ. शैलेंद्रसिंह होडगर यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील मांचीहिल शैक्षणिक संकुलात आयोजित ८० व्या स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण कार्यक्रमात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. संस्थेचे संस्थापक शाळीग्राम होडगर, संचालिका नीलिमा गुणे, विश्वस्त डॉ. दिग्विजयसिंह होडगर, प्राचार्य विजय पिसे, उपाध्यक्ष अण्णासाहेब बलमे, उपप्राचार्य गंगाधर चिंधे, जनरल मॅनेजर किसन हजारे, राजू बोंद्रे आदि याप्रसंगी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. शैलेंद्रसिंह होडगर यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. याप्रसंगी एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाला शिस्तबध्द संचलन करत मानवंदना दिली. त्यानंतर अर्चना तांबे यांनी सादर केलेल्या 'ये मेरे वतन के लोगो' या देशभक्तीपर गीताने उपस्थितांची मने जिंकली आणि परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला.
दरम्यान, यावेळी संकुलातील सर्व संस्थांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते. तर, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर कार्ले यांनी केले.