◻ रस्त्याची झाली दुरावस्था ; सर्वसामान्य शेतकऱ्याना फटका.
संगमनेर Live | (राजू नरवडे) : संगमनेर तालुक्याच्या पठारभागात शनिवारी दुपारी झालेल्या ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसाने अनेक गावांसह वाड्या वस्त्यांचा संपर्क तुटल्यामुळे नागरिकान मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तर पठारभागात चोहीकडे मुसळधार पावसामुळे पाणीच पाणी पाहवयास मिळत असून ओढे नाले तुडूंब भरून वाहू लागल्यामुळे शेतकऱ्यांनमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी या पावसामुळे उद्धभवलेल्या विविध समस्याचा त्रास ही सहन करावा लागत आहे.
मागील अनेक दिवसांपासून पठारभागात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे परिसरातील लहान - मोठे पाझर तलाव, सिमेंट बंधारे, ओढे - नाले तसेच विहीरी तुडूंब भरून वाहात आहे. तर बोअरवेल मधूनही आपोआप पाणी वाहत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहवयास मिळत आहे. सततच्या पावसाने डोंगरांनाही पाझर फुटला असताना शनिवारी दुपारी ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसाने चांगलेच थैमान घातल्यामुळे अवघ्या काही तासातच सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. अनेक वर्षानपासून बंद असलेले ओढे नाले तुडूंब भरून वाहू लागले आहेत. यामुळे माहुली फाटा ते साकूरला जाणाऱ्या मधल्या धुमाळवाडी रस्त्यावर गुडघ्यापर्यत उंचीचे पाणी वाहत होते. त्यामुळे माहुली, धुमाळवाडी, हिवरगाव पठार, साकूर या गावांसह परिसरातील वाड्या - वस्त्यांचा इतर गावाशी संपर्क तुटला होता.
नांदूर खंदरमाळ परिसरात सुद्धा अशीच अवस्था झाली होती, ठिक ठिकाणी वाड्या वस्त्यांचा संपर्क तुटला होता. अनेक वर्षांनंतर ऐवढे पाणी पाहवयास मिळाल्याचे वयोवृद्ध लोक सांगत आहेत. ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतीचे बांदही मोठ्या प्रमाणात फुटल्याने शेतांमधील मातीही पाण्यामुळे वाहून गेली आहे. यामुळे मोठ्या नुकसानीचा सामना सर्वसामान्य शेतकऱ्याना करावा लागत आहे. गावोगावच्या रस्त्यांन बरोबरच वाड्या वस्त्यांवर जाणारे रस्तेही पावसामुळे वाहून गेल्यामुळे रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था सर्वत्र पाहवयास मिळत आहे.