राजकारणासाठी पिढ्यानपिढ्याच्या विकासावर घाला - बाळासाहेब थोरात

संगमनेर Live
0
राजकारणासाठी पिढ्यानपिढ्याच्या विकासावर घाला - बाळासाहेब थोरात 

◻️ ​नाशिक-पुणे रेल्वे मार्ग बदलावर ज्येष्ठ नेते थोरात यांचा तीव्र आक्षेप

 ◻️ माणसांना अभय देणारा कायदा करण्याची केली मागणी 

​संगमनेर LIVE | नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पाचा प्रस्तावित मार्ग संगमनेर तालुक्यातून अचानक बदलल्यामुळे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘पिढ्यानपिढ्यांच्या विकासकामांमध्ये राजकारण करणे अत्यंत दुर्दैवी आहे. कुणाच्या तरी शब्दाखातर हा नैसर्गिक मार्ग बदलला गेला, जो पुढील पिढ्यानपिढ्यांच्या विकासावर घाला घालणारा आहे,’ असे आक्रमक मत त्यांनी व्यक्त केले.

​सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर माध्यमांशी बोलताना थोरात यांनी रेल्वे मार्गाच्या बदलावर जोरदार टीका केली.

​थोरात यांनी स्पष्ट केले की, नाशिक-पुणे रेल्वेसाठी संगमनेर हा नैसर्गिक आणि अत्यंत सोयीचा मार्ग आहे. संगमनेर तालुक्यात या मार्गासाठी सर्व्हे पूर्ण झाला होता आणि अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचे अधिग्रहण मान्य करून त्या दिल्या आहेत. जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांशी हा अन्याय आहे. या मार्गामुळे विमानतळ, शिर्डी आणि लोणी ही महत्त्वाची ठिकाणे थेट जोडली गेली असती, ज्यामुळे हे सर्वांच्या दृष्टीने सोयीचे होते. अकोले तालुक्याची मागणी असली तरी, हा डोंगरी भाग असल्याने रेल्वेचा खर्च प्रचंड वाढवणारा आहे.

​‘हे सगळे नियोजन होऊनही मार्ग बदलला जात असेल, तर हे केवळ राजकारणातून होत आहे. राजकारण करण्यासाठी इतर अनेक गोष्टी आहेत, परंतु पायाभूत विकास कामात राजकारण करू नये,’ असे थोरात म्हणाले.

​थोरात यांनी निळवंडे धरण आणि कालवे पूर्ण केल्याचा संदर्भ देत सांगितले की, अशा विकास प्रकल्पांचे भविष्य अनेक पिढ्यांसाठी उज्ज्वल असते. ‘निळवंडेमुळे संगमनेर, अकोले, राहाता, राहुरी, सिन्नर या दुष्काळी भागांना पाणी मिळाले आहे. एक निळवंडे किंवा भंडारदर्‍यामुळे संपूर्ण जिल्ह्याचा विकास झाला. अशा पायाभूत कामांत राजकारण आणून पुढील पिढ्यांचे भवितव्य धोक्यात घालणे चुकीचे आहे.’

​बाळासाहेब थोरात यांनी नाशिक-पुणे रेल्वेच्या मार्गात झालेला बदल अत्यंत निषेधार्ह असून, रेल्वे नियोजित संगमनेर मार्गेच झाली पाहिजे, या मागणीचा पुनरुच्चार केला.

​बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांवर चिंता, माणसांना अभय देण्याचा कायदा करा

​यावेळी थोरात यांनी सह्याद्रीच्या पायथ्याशी वाढलेल्या बिबट्यांच्या वावराबद्दल आणि माणसांवरील हल्ल्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त करताना ​माणसांच्या सुरक्षेची मागणी करताना म्हणाले की, प्राण्यांना अभय देण्यासाठी अभयारण्ये आणि कायदे आहेत, पण आता माणसांना अभय मिळण्याकरता कायदा करण्याची गरज आहे. पहिले माणसांना अभय द्या आणि मग प्राण्यांचा विचार करा,' अशी मागणी त्यांनी केली. तसेच ​शेळ्या सोडण्याच्या योजनेवर टीका करताना ते म्हणाले, या योजनेत मोठा भ्रष्टाचार होईल. शेळ्या जंगलात सोडल्या आणि त्या बिबट्यांनी खाल्ल्या, हे भ्रष्टाचारासाठी सोपे कारण मिळेल,' असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !