अचूक जलनियोजनाने अहिल्यानगरची तहान भागली - मंत्री विखे पाटील

संगमनेर Live
0
अचूक जलनियोजनाने अहिल्यानगरची तहान भागली - मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

◻️ ​भंडारदरा, निळवंडे, मुळा आणि कुकडी प्रकल्पांचे सुयोग्य नियोजन; टँकरची मागणी घटली


संगमनेर LIVE (​लोणी) | अहिल्यानगर जिल्ह्याने आजवर पाण्याचा मोठा संघर्ष अनुभवला आहे, मात्र यंदा जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूक्ष्म नियोजनामुळे जिल्ह्याला पाणीटंचाईची तीव्रता जाणवली नाही. उन्हाच्या कडाक्यातही आवर्तनांच्या माध्यमातून मिळालेल्या पाण्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला असून, प्रशासनावरील टंचाईचा भारही लक्षणीयरीत्या हलका झाला आहे.

​यावर्षीच्या नियोजनाचे सर्वात मोठे यश म्हणजे ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच निळवंडे धरणाचे पाणी लाभक्षेत्रातील ओढ्या-नाल्यांच्या माध्यमातून सोडून गावातील तलावांमध्ये साठवण्यात आले. या ऐतिहासिक बदलामुळे जिरायती भागातील भूजल पातळी वाढण्यास मदत झाली असून शेती उत्पादनासाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याचे आणि शेतीचे सुयोग्य नियोजन झाल्यामुळे अनेक ठिकाणी वर्षानुवर्षे असलेली टँकरची मागणी यंदा घटल्याचे पाहायला मिळत आहे, ज्यामुळे शासनाचा मोठा आर्थिक भुर्दंड वाचला असून प्रशासकीय यंत्रणेचा ताणही कमी झाला आहे.

​जिल्ह्यातील राजकीय आणि जलविषयक प्रश्नांनाही यंदा सकारात्मक वळण मिळाले आहे. यापूर्वी कुकडी प्रकल्पाचे पाणी मिळवण्यावरून अनेक राजकीय पेच निर्माण होत असत, मात्र राज्याचे जलसंपदामंत्री जिल्ह्याचेच असल्याने प्रथमच कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक अहिल्यानगरमध्ये संपन्न झाली. या बैठकीनंतर झालेल्या अचूक नियोजनामुळे कुकडी धरण समूहातील २७.८९ टीएमसी उपयुक्त साठ्याचा लाभ रब्बी हंगामासाठी जिल्ह्याला मिळाला आहे. तसेच, समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे जायकवाडीला पाणी सोडण्याचा जो तणाव प्रशासनावर असायचा, तो यंदा निसर्गाच्या साथीने आणि योग्य व्यवस्थापनाने सुसह्य झाला आहे. जायकवाडीत पुरेसा साठा असतानाही जिल्ह्याचा पाणी साठा सुरक्षित राखण्यात यश आले आहे.

​उत्तर अहिल्यानगरमधील दुष्काळी भागासाठी वरदान ठरलेल्या निळवंडे आणि भंडारदरा प्रकल्पांचे पाणी आता थेट लाभक्षेत्रातील शेवटच्या गावापर्यत पोहोचू लागले आहे. मंत्री विखे पाटील यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत केलेल्या समन्वयामुळे ही आवर्तने शेतकऱ्यांच्या मागणीनुसार वेळेत सुरू झाली. यामुळे केवळ शेतीच नव्हे, तर कालव्यांवर अवलंबून असलेल्या पिण्याच्या पाणी योजनांनाही मोठा आधार मिळाला आहे.

​“सन २०२५-२६ मध्ये जून ते ऑक्टोबर दरम्यान भंडारदरा धरणावर ५५० मिमी पाऊस झाला. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी धरणात समाधानकारक साठा उपलब्ध होता. शेतकऱ्यांच्या गरजेनुसार आणि हक्काच्या पाण्यानुसार आम्ही आवर्तने सोडली, ज्याचा फायदा शेवटच्या टोकाच्या गावापर्यंत पोहोचला आहे.” असे जलसंपदा विभागाने म्हटले.

दरम्यान ​उन्हाची तीव्रता वाढत असली तरी, धरणांमधील साठा आणि स्थानिक जलस्त्रोतांमध्ये असलेले पाणी यामुळे सध्या ग्रामीण भागातून टॅकरची मागणी नाही. प्रशासनाने जरी तालुकास्तरावर पूर्वतयारी केली असली, तरी मंत्र्यांच्या 'वॉटर मॅनेजमेंट'मुळे जिल्ह्याची तहान भागली असून शेती उत्पादनातही मोठी वाढ होण्याची चिन्हे आहेत.

पाणी वापर आणि सिंचन स्थिती..

​अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख धरणे आणि सिंचन प्रकल्पांमधून रब्बी हंगामातील पिकांसाठी पाणी सोडण्याची प्रक्रिया सध्या वेगात सुरू आहे. भंडारदरा आणि निळवंडे धरणांचा एकत्रित विचार करता, आतापर्यंत रब्बी हंगामातील बिगर सिंचन आणि सिंचनासाठीच्या दोन आवर्तनांमध्ये अनुक्रमे ३१६ आणि १६०९ दलघफु पाण्याचा वापर झाला आहे. निळवंडे धरणातून कालव्यांसाठी आजवर १६६७ दलघफु पाणी वापरले गेले असून, १३ फेब्रुवारी २०२६ पासून नवीन आवर्तन सुरू करण्यात आले आहे. जिल्हयातील सर्वात मोठा मुळा प्रकल्प (२१५०० दलघफु) असून, येथून २३ फेब्रुवारीपासून डाव्या कालव्याद्वारे रब्बीचे आवर्तन सोडले जात आहे.

​यासोबतच, आढळा, मांडओहोळ आणि घाटशिळ पारगांव या मध्यम प्रकल्पांमधूनही फेब्रुवारीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यापासून सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले आहे. आढळा प्रकल्पातून २१ फेब्रुवारी, मांडओहोळमधून १७ फेब्रुवारी, तर घाटशिळ पारगांवमधून ११ फेब्रुवारीपासून आवर्तने सुरू आहेत. लघु पाटबंधारे विभागांतर्गत सांगवी आणि पाडोशी प्रकल्पांतील पाणी वापरानंतर, आता लोहारे, कासारे, घोटी शिळवंडी, बलठण आणि शिरपुंजे या प्रकल्पांमधूनही लाभधारकांच्या मागणीनुसार पाणी सोडले जात आहे. एकूणच, रब्बी पिकांना जीवदान देण्यासाठी सर्वच प्रकल्पांतून नियोजित पद्धतीने पाण्याचे नियोजन केले जात असल्याचे दिसून येते.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !