सात्रळच्या अल्फा क्लासेसचे ‘राष्ट्रीय रांगोत्सव' स्पर्धेत घवघवीत यश
◻️ विद्यार्थ्यानी देशपातळीवर ३५ पदकांसह २२ सुवर्ण पदकावर कोरले नाव
संगमनेर LIVE (सात्रळ) | राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील कला क्षेत्रात अग्रेसर असलेल्या ‘अल्फा क्लासेस’ च्या विद्यार्थ्यानी आपल्या कल्पकतेचा आणि अफाट कलेचा ठसा उमटवत राष्ट्रीय स्तरावर मोठी झेप घेतली आहे. कला क्षेत्रातील अत्यंत मानाची समजली जाणाऱ्या ‘राष्ट्रीय रांगोत्सव' स्पर्धेत या विद्यार्थ्यानी तब्बल ३५ पदकांची कमाई करत सात्रळचे नाव देशभर पोहोचवले आहे. यामध्ये २२ सुवर्ण, ८ रौप्य आणि ५ कांस्य पदकांचा समावेश असल्याची माहिती संस्थेचे संचालक प्रा. स्वप्नील कडू यांनी दिली.
देशभरातील विविध राज्यांतील हजारो स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या स्पर्धेत अल्फा क्लासेसच्या विद्यार्थ्यानी रेखाटलेली निसर्गचित्रे, दिलेले सामाजिक संदेश आणि पारंपारिक रांगोळी प्रकारांनी उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या या कलाकृतींना राष्ट्रीय परीक्षकांनी विशेष दाद दिली. केवळ पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देणे हेच संस्थेचे उद्दिष्ट असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी शिवांजली गागरे, प्रणव निधाने, स्नेहल सूर्यवंशी, पायल जगताप, चेतन शिंदे, मितेश अनाप, मुज्जमील शेख, अजिंक्य कोतकर, समीक्षा पाटोळे, साईराज सिनारे, महक पिंजारी, साईशा दिघे, उर्वी घोलप, समृद्धी शिंदे, दीपाली खेमनर, प्रनीषा खेमनर, कीर्ती निधाने, कृष्णा अनाप, हर्षल घोलप, सुजय सांगळे आणि तेजस शिंदे या २२ विद्यार्थ्यानी सुवर्ण पदक पटकावून आपली मोहोर उमटवली. तसेच अर्णव अंत्रे, प्रणाली गावडे, ईश्वरी कडू, अर्पिता साळुंके, कृष्णा फणसे, रचना अनाप, संस्कृती डुक्रे व समीक्षा पलघडमल या ८ विद्यार्थ्यानी रौप्य पदकावर आपले नाव कोरले, तर अथर्व पलघडमल, प्रणव गिते, ईश्वरी थोरात, स्नेहल कडू आणि साई डुक्रे या ५ विद्यार्थ्यांनी कांस्य पदक मिळवून संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
“केवळ पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्याच्या अंगभूत कलागुणांना वाव देणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. विद्यार्थ्याचा सातत्यपूर्ण सराव आणि त्यांची कल्पकता यामुळेच हे यश शक्य झाले आहे. राष्ट्रीय स्तरावरील हे व्यासपीठ इतर विद्यार्थ्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.” असा विश्वास प्रा. स्वप्नील कडू यांनी व्यक्त केला.
दरम्यान या यशस्वी विद्यार्थ्याना तृप्ती कडू, महेश घोलप, रेखा प्रधान, अमोल जाधव या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्याच्या या यशाबद्दल सात्रळ पंचक्रोशीसह त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. अशी माहिती पत्रकार समर्थ वाकचौरे यांनी कळवली आहे.