सरकारने साखर कारखानदारीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे!

संगमनेर Live
0
सरकारने साखर कारखानदारीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे!

◻️ बाळासाहेब थोरात यांची थोरात कारखान्याचा गळीत हंगाम सांगता प्रसंगी आग्रही मागणी

​संगमनेर LIVE | “साखर कारखानदारी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य आधारस्तंभ असून या उद्योगाच्या माध्यमातून सरकारला दरवर्षी हजारो कोटींचा महसूल प्राप्त होतो. मात्र, जागतिक आणि स्थानिक परिस्थितीमुळे साधारण दर दहा वर्षातून एकदा या क्षेत्राला मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो. अशा कठीण प्रसंगी सरकारने कारखानदारीला वाऱ्यावर न सोडता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून धोरणात्मक निर्णय घेणे काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ च्या गळीत हंगामाच्या सांगता समारंभात ते बोलत होते.

​यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी केंद्र व राज्य सरकारकडे साखर उद्योगाला सावरण्यासाठी विविध मागण्या मांडल्या. आर्थिक अडचणीत सापडलेल्या कारखान्यांसाठी तातडीने कर्ज पुनर्गठन योजना राबवणे, साखरेची आधारभूत किंमत वाढवून ती किमान ४ हजार रुपये करणे, आणि कारखान्यांना बिनव्याजी किंवा अत्यंत अल्प दराने कर्ज उपलब्ध करून देणे या गोष्टी प्राधान्याने करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पेट्रोलला शाश्‍वत पर्याय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इथेनॉलला योग्य भाव देऊन या उत्पादनास प्रोत्साहन दिल्यास कारखानदारीची आर्थिक स्थिती सुधारेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

​यंदाच्या हंगामातील आव्हानांवर भाष्य करताना थोरात म्हणाले की, राज्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे उसाच्या उत्पादनात घट झाली असून कारखान्यांची संख्या वाढल्याने स्पर्धाही तीव्र झाली आहे. अशा परिस्थितीतही थोरात कारखान्याने आपली गौरवशाली परंपरा जपत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अवघ्या ११० दिवसांच्या विक्रमी कालावधीत ७ लाख ६५ हजार मेट्रिक टनाचे यशस्वी गाळप पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे कारखान्याने ११.४० टक्के इतका दर्जेदार साखर उतारा मिळवत आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. याच प्रसंगी त्यांनी निळवंडे धरणाचे पाणी कालव्यांद्वारे शेतात पोहोचत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले, परंतु हे पाणी शेवटच्या लाभार्थ्यापर्यत पोहोचवणे हेच आपले ध्येय असल्याचे नमूद केले.

​कारखान्याने केवळ उत्पादनातच नव्हे, तर सभासद आणि कामगारांच्या कल्याणातही मोठे पाऊल उचलले आहे. कामगारांच्या कष्टाची दखल घेऊन सर्व कर्मचाऱ्यांना १० टक्के वेतनवाढ जाहीर करण्यात आली असून, कारखान्याच्या शैक्षणिक आणि आर्थिक पाठबळामुळे आज अनेक कामगारांची मुले देश-परदेशात उच्च पदावर कार्यरत आहेत. असे शेवटी म्हटले आहे.

दरम्यान या कार्यक्रमात माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले, नामदेव कहांडळ यांनी सूत्रसंचालन केले आणि व्हाईस चेअरमन पांडुरंग घुले यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !