मुळा लाभक्षेत्राताला २३ फेब्रुवारीपासून रब्बीचे दुसरे आवर्तन!
◻️ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आदेश; २७ हजार हेक्टर क्षेत्राला मिळणार जीवदान
संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | मुळा धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची पाण्याची निकड आणि सध्या वाढलेली उन्हाची तीव्र तीव्रता लक्षात घेऊन, रब्बी हंगाम २ साठी २३ फेब्रुवारी २०२६ पासून पाणी सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने आवर्तन सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
सद्यस्थितीत लाभक्षेत्रात पाण्याची पातळी खालावल्यामुळे शेतकरी बांधवांकडून पाणी सोडण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत होती. या पार्श्वभूमीवर आमदार मोनिकाताई राजळे आणि आमदार विठ्ठलराव लंघे यांनी मंत्री विखे पाटील यांची भेट घेऊन पिकांची स्थिती आणि पिण्याच्या पाण्याची गरज मांडली होती, ज्याची दखल घेत हे आवर्तन सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
या नियोजित आवर्तनामुळे मुळा उजव्या कालव्यावरील राहुरी, नेवासा, शेवगाव आणि पाथर्डी या तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. उजव्या कालव्यासाठी धरणातील ५ टीएमसी इतका पाणीसाठा राखीव ठेवण्यात आला असून, हे आवर्तन एकूण ४५ दिवस चालणार आहे. यामुळे सुमारे २७ हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळेल. त्याचप्रमाणे मुळा डाव्या कालव्यासाठी ४५० एमसीएफटी पाणीसाठा उपलब्ध करून देण्यात आला असून, येथील आवर्तन २१ दिवस चालेल. या निर्णयामुळे डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील साधारण २५०० हेक्टरवरील पिकांना जीवदान मिळणार आहे.
मंत्री विखे पाटील यांनी आवर्तनाचा कालावधी निश्चित करताना धरणातील एकूण पाणीसाठा आणि भविष्यातील पाण्याचे योग्य नियोजन करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. आवर्तनाच्या काळात पाण्याचा कोणताही अपव्यय होणार नाही याची काटेकोर दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. विशेषतः शेवटच्या टोकाच्या (टेलच्या) शेतकऱ्यापर्यत पाणी पोहोचेल, अशा पद्धतीने सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी पाटबंधारे विभागाला दिले आहेत. या निर्णयामुळे ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.