“छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जगासाठी प्रेरणादायी” - बाळासाहेब थोरात
◻️ ‘रायबा हेच का आपलं स्वराज्य’ महानाटकाने संगमनेरकराच्या काळजात शिवविचार!
संगमनेर LIVE | छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जाती-धर्माच्या लोकांना एकत्र गुंफून स्वराज्याची संकल्पना साकारली. मात्र, आजचे जातीपातीचे राजकारण, महिलांवरील अत्याचार आणि व्यसनाधीनता पाहून ‘हेच का महाराजांचे स्वराज्य?’ असा संतप्त सवाल विचारणाऱ्या ‘रायबा हेच का आपलं स्वराज्य’ या महानाटकाने उपस्थित हजारो संगमनेरकरांच्या डोळ्यात अंजन घातले.
कवी अनंत फंदी नाट्यगृहात जयहिंद लोकचळवळीच्या वतीने आयोजित या महानाटकाला माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजीत तांबे, सौ. दुर्गाताई तांबे आणि नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि हजारो युवक-महिलांची अभूतपूर्व उपस्थिती लाभली होती.
या प्रयोगादरम्यान सादर झालेल्या अनेक हृदयद्रावक प्रसंगांनी उपस्थितांना आपले अश्रू आवरता आले नाहीत.
या महानाट्यामध्ये सध्याच्या सामाजिक स्थितीवर अतिशय प्रभावी भाष्य करण्यात आले. यामध्ये विशेषतः शेतकरी आत्महत्येचा हृदयस्पर्शी प्रसंग पाहून संपूर्ण सभागृह स्तब्ध झाले होते, तर स्वराज्याच्या पवित्र गडकिल्ल्यांवर आजच्या तरुणाईकडून होणारी हुल्लडबाजी आणि जल्लोष हा चिंतेचा विषय असल्याचे अधोरेखित करण्यात आले.
आजची सामाजिक स्थिती, स्त्रियांवरील अत्याचार आणि जाती-पातीच्या नावावर होणारे राजकारण पाहून व्यथित झालेल्या महाराजांनी जेव्हा आपल्या जिरेटोपाचा आणि भवानी तलवारीचा त्याग केला, तो प्रसंग प्रत्येकाच्या अंगावर शहारे आणणारा ठरला. यासोबतच अफजल खान वध, आग्रा सुटका, शिवा काशीद यांचे बलिदान आणि तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचा थरार ४० हून अधिक स्थानिक कलाकारांनी आपल्या कसदार अभिनयातून जिवंत केला.
यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन कार्य केवळ इतिहास नसून ती संपूर्ण जगासाठी एक प्रेरणा आहे. संकटकाळात महाराजांचे विचार मार्ग दाखवणारे ठरतात, परंतु आज समाजात भ्रष्टाचार आणि जातीवादाचे जे विष कालवले जात आहे, ते अत्यंत दुर्दैवी आहे. महाराजांच्या विचारांचे खऱ्या अर्थाने स्वराज्य निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने आता कटिबद्ध होण्याची गरज आहे.
आमदार सत्यजीत तांबे यांनी देखील तरुणांना साद घालताना सांगितले की, युवकांनी फक्त जयंती उत्सवापुरते मर्यादित न राहता महाराजांचे विचार घराघरात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत, कारण आजची ढासळलेली सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी शिवविचारांशिवाय दुसरा पर्याय नाही.
दरम्यान हे महानाटक त्याच्या भव्य दिव्य नेपथ्यामुळे आणि आकर्षक विद्युत रोषणाईमुळे अधिकच प्रभावी ठरले. प्रेक्षकांमधून होणारी मावळ्यांची एन्ट्री आणि महाराजांचे व्यासपीठावर होणारे आगमन यामुळे शिवकालीन वातावरण निर्माण झाले होते. संगमनेरचे सुपुत्र डॉ. सागर फापाळे व प्रा. प्रकाश कुमार वाघमारे यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे महानाटक केवळ एक मनोरंजन नसून, आजच्या समाजव्यवस्थेवर ओढलेले आसूड होते, अशी भावना उपस्थित नागरिकांनी यावेळी व्यक्त केल्या.