महाराजांचा ‘सुराज्य’ संकल्प आजच्या पिढीने आत्मसात करावा - सौ. प्रभावती घोगरे
◻️ लोणी खुर्द येथे शिवजयंती उत्साहात साजरी; जयघोषाने परिसर दुमदुमला!
संगमनेर LIVE (राहाता) | राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात, भक्तीमय आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. वेताळबाबा चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी ग्रामस्थ, युवक-युवती, महिला तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. “जय जिजाऊ, जय शिवराय”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. महाराजांच्या पराक्रमाचा आणि त्यांच्या सुराज्य संकल्पाचा जागर करण्यात आला.
महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीच्या सरचिटणीस सौ. प्रभावती जनार्दन घोगरे यांनी उपस्थित राहून ग्रामस्थांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या मनोगतात त्या म्हणाल्या, “छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती-जमातींना एकत्र आणत स्वराज्याची स्थापना केली. माता-भगिनींचा सन्मान, शेतकऱ्यांचे रक्षण आणि रयतेला न्याय देणे हा त्यांच्या राज्यकारभाराचा मूलमंत्र होता. आजच्या पिढीने महाराजांचे शौर्य, स्वाभिमान आणि संघटनशक्ती आत्मसात करून समाजहितासाठी कार्य करणे हीच खरी शिवजयंती ठरेल.”
कार्यक्रमादरम्यान दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना ग्रामस्थांच्या वतीने दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यानंतर पारंपरिक अश्वनृत्याचे आकर्षक सादरीकरण करण्यात आले. शिवकालीन वेशभूषेत सादर करण्यात आलेल्या बालकलाकारांच्या देखाव्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
दरम्यान कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. जनार्दन चंद्रभान घोगरे प्रतिष्ठान तसेच ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले. शिवजयंती निमित्त संपूर्ण गावात उत्साह आणि शिवभक्तीचे वातावरण पाहायला मिळाले.