पुणे-नाशिक रेल्वे मार्गाचा फेरविचार होणार - पालकमंत्री विखे पाटील
◻️ मंत्री विखे पाटलांचा रोहित पवारांच्या दररोजच्या वक्तव्यांवर आक्षेप
संगमनेर LIVE | विमान अपघाताची सत्यता समोर येणे हा पवार कुटुंबाचा अधिकार असला, तरी आमदार रोहित पवार यांच्याकडून होणारी दररोजची विधाने अत्यंत क्लेषदायक आहेत. अजितदादा हयात असताना तुम्ही त्यांना नेमकी कशी वागणूक दिली आणि राष्ट्रवादी कॉग्रेसकडे बहुमत असूनही त्यांना मुख्यमंत्री होण्यापासून कोणी रोखले, असा परखड सवाल राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे.
संगमनेर येथे माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील यांनी पवार कुटुंबातील अंतर्गत संघर्षावर भाष्य करत रोहित पवार यांच्या मांडणीवर तीव्र आक्षेप नोंदवला.
विमान अपघाताच्या तपासाबाबत भूमिका स्पष्ट करताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होऊन सत्य माहिती समोर यावी, ही केवळ पवार कुटुंबाचीच नाही तर राज्यातील जनतेचीही अपेक्षा आहे. सध्या या अपघाताची चौकशी सुरू असून, कुटुंबाने केलेल्या मागणीनुसार मुख्यमंत्री सीबीआय तपासाबाबतही योग्य तो निर्णय घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मात्र, या विषयावर दररोज माध्यमांसमोर येऊन ज्या पद्धतीने राजकीय मांडणी केली जात आहे, ती पाहता पवारांनी इतिहासातील स्वतःच्या वागणुकीचाही विचार करावा, असा टोला त्यांनी लगावला. राष्ट्रवादीकडे संख्याबळ असतानाही अजितदादांना मुख्यमंत्री होण्याची संधी का मिळू दिली नाही आणि काकांनी त्यांना कशी वागणूक दिली, याची उत्तरेही महाराष्ट्राला मिळाली पाहिजेत, असे त्यांनी ठामपणे नमूद केले.
राजकीय टीकेसोबतच विखे पाटील यांनी संगमनेर-अकोले भागातील रेल्वे प्रकल्पाच्या संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली. त्यांनी नुकतीच दिल्लीत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली असून २०१९ साली निश्चित झालेल्या रेल्वे मार्गात २०२१ मध्ये कोणाच्या आदेशाने बदल करण्यात आला, यावर चर्चा केली. या प्रकल्पासाठी महामंडळ स्थापन होऊन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली होती, मात्र जमिनीचे अधिग्रहण आणि खोदड येथील जीएमआरटी केंद्राच्या तांत्रिक अडचणींमुळे या प्रकल्पात अडथळे आले आहेत. या सर्व विषयांवर पुन्हा फेरविचार करण्याची ग्वाही रेल्वे मंत्र्यांनी दिली असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.
आगामी अधिवेशन काळात पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या विषयाबरोबरच जिल्ह्यातील इतर रेल्वे प्रश्नांच्या संदर्भात राज्य सरकार आणि महारेलच्या अधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. मूळ रेल्वे मार्गच संगमनेर आणि अकोले या दोन्ही तालुक्यांची जीवनरेखा असल्याने या मार्गाचे संवर्धन करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.