आई तुळजाभवानीचा भव्य देखावा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी
◻️ छत्रपती शिवरायांचे विचार जगासाठी सदैव प्रेरणादायी - बाळासाहेब थोरात
संगमनेर LIVE | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त ‘स्वाभिमानी संगमनेर शहर व तालुका समिती’च्या वतीने यावर्षी संगमनेरमध्ये शिवजन्मोत्सवाचा मोठा सोहळा पार पडला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात साकारण्यात आलेल्या आई तुळजाभवानीच्या भव्य देखाव्याने संगमनेरकरांचे डोळे दिपवून टाकले असून, या सोहळ्याला नागरिकांनी मोठी पसंती दिली आहे.
या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरलेला आई तुळजाभवानीचा विलोभनीय देखावा पाहण्यासाठी शहर व परिसरातून जनसागर लोटत आहे. सोहळ्याची सुरुवात अत्यंत उत्साहात झाली असून, किल्ले शिवनेरी ढोल-ताशा पथकाच्या दणदणाटाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. आधुनिकता आणि परंपरेचा सुरेख संगम साधत डी.जे. चा जल्लोष, फुलांची आकर्षक सजावट आणि फटाक्यांच्या भव्य आतिषबाजीत झालेली छत्रपतींची आरती हा उपस्थितांसाठी एक अविस्मरणीय आणि संस्मरणीय क्षण ठरला.
देखाव्याच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, “मानवताधर्म, लोकशाही आणि खऱ्या अर्थाने सुराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहेत. सर्व संत, समाजसुधारक यांचे विचार घेऊन अठरापगड जाती आणि बारा बलुतेदारांचे स्वराज्य महाराजांनी उभे केले.”
त्यांनी पुढे नमूद केले की, स्त्रियांचा आदर, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांची काळजी हे महाराजांच्या स्वराज्याचे मुख्य सूत्र होते. आजच्या अशांततेच्या काळात महाराजांचे विचार घेऊन काम केल्यास खऱ्या अर्थाने सुराज्य निर्माण होईल.
दरम्यान शिव जन्मोत्सवानिमित्त उभारण्यात आलेला हा ‘आई तुळजाभवानी देखावा’ पुढील तीन दिवस नागरिकांसाठी दर्शनासाठी खुला राहणार आहे. तर, सध्या संपूर्ण संगमनेर शहर शिवमय झाले आहे.