परिचर्या सेवेतून समाजाचे आरोग्य उंचावेल - सौ शलिनीताई विखे पाटील

संगमनेर Live
0
परिचर्या सेवेतून समाजाचे आरोग्य उंचावेल - सौ शलिनीताई विखे पाटील

◻️ ​डॉ. विखे पाटील परिचर्या महाविद्यालयात पदवी प्रदान सोहळा संपन्न


संगमनेर LIVE (​अहिल्यानगर) | ​“रुग्ण सेवा हीच ईश्‍वर सेवा असून समाजाचे शारीरिक, मानसिक व सामाजिक आरोग्य उंचावण्याची मोठी जबाबदारी परिचर्या विद्यार्थ्यावर आहे. सेवाभाव, शिस्त आणि समर्पण या गुणांच्या जोरावर परिचर्या विद्यार्थी समाजाच्या आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम बनवतील,” असा विश्‍वास माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शलिनीताई विखे पाटील यांनी व्यक्त केला. 

डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या परिचर्या महाविद्यालयात ५ मार्च रोजी दीपप्रज्वलन, शपथग्रहण, पदवी प्रदान, माजी विद्यार्थी मेळावा आणि वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी सौ. शलिनीताई विखे पाटील आणि विश्‍वस्त वसंतराव शाहूजी कापरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

​कार्यक्रमाच्या प्रारंभी आधुनिक परिचर्या सेवेच्या जनक फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत बी.एस्सी. नर्सिग आणि जनरल नर्सिग अ‍ॅड मिडवाइफरी अभ्यासक्रमातील सुमारे १८० विद्यार्थ्यानी रुग्णसेवेची पवित्र शपथ घेतली. याच सोहळ्यात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या १२० विद्यार्थ्याना मान्यवरांच्या हस्ते पदव्या प्रदान करण्यात आल्या.

महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख मांडताना यावेळी “नर्सिंगमध्ये नेतृत्व आणि व्यवस्थापन” या विशेष पुस्तकाचे व वार्षिक नियतकालिकाचे प्रकाशन करण्यात आले. या सोहळ्याचे आणखी एक आकर्षण म्हणजे आयोजित केलेला माजी विद्यार्थी मेळावा, ज्यासाठी १९५ माजी विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावून आपल्या आठवणींना उजाळा दिला.

​अध्यक्षीय भाषणात शलिनीताई विखे पाटील पुढे म्हणाल्या की, विखे पाटील परिचर्या महाविद्यालयात दिले जाणारे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण हीच या संस्थेची खऱ्या अर्थाने ओळख आहे. याच दर्जामुळे येथे प्रवेशासाठी विद्यार्थ्याची मोठी प्रतीक्षा यादी असते, ही संस्थेसाठी अभिमानाची बाब आहे, असे म्हटले.

कार्यक्रमादरम्यान कला व क्रीडा विभागातील विजेत्या विद्यार्थ्याचा आणि माजी विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आरोग्य क्षेत्रात नर्सेसना समानतेची व सन्मानपूर्वक वागणूक मिळावी, अशी रास्त अपेक्षा व्यक्त केली.

​संस्थेचे चेअरमन राधाकृष्ण विखे पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुजय विखे पाटील यांनी सर्व पदवीधरांचे त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. या सोहळ्याला संस्थेचे सेक्रेटरी डॉ. पी. एम. गायकवाड, संचालक प्रा. डॉ. अभिजीत दिवटे, ब्रिगेडियर डॉ. अरुण त्यागी, मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रा. डॉ. रामचंद्र पडळकर यांच्यासह विविध विभागांचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या डॉ. प्रतिभा चांदेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपप्राचार्या डॉ. योगिता औताडे यांनी केले.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !