सरकारने शेतकरी कर्जाच्या विळख्यातून मुक्त करावा - बाळासाहेब थोरात

संगमनेर Live
0
सरकारने शेतकरी कर्जाच्या विळख्यातून मुक्त करावा - बाळासाहेब थोरात

◻️ ​नियमित कर्ज भरणाऱ्यां शेतकऱ्यांना १ लाखांचे अनुदान देण्याची मागणी 


​संगमनेर LIVE | राज्य सरकारने नुकताच जाहीर केलेला अर्थसंकल्प हा सर्वसामान्य नागरिक आणि बळीराजाची घोर निराशा करणारा आहे. या अर्थसंकल्पातून केलेली कर्जमाफीची घोषणा अत्यंत तुटपुंजी असून, सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी ‘सरसकट कर्जमाफी’ जाहीर करणे आवश्यक होते, अशी आक्रमक मागणी कॉग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

​अर्थसंकल्पावर सडकून टीका करताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोणतीही अट न ठेवता शेतकऱ्यांना २ लाख रुपयांची कर्जमाफी आणि नियमित कर्ज भरणाऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान विनासायास देण्यात आले होते. 

मात्र, त्यानंतरच्या ५-६ वर्षाच्या काळात शेतकरी अधिकच संकटात सापडला आहे. सध्याच्या सरकारने जाहीर केलेली दोन लाखांची कर्जमाफी ही पुरेशी नसून, शेतकरी पूर्णपणे कर्जमुक्त व्हावा यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे होते. यासाठी सरकारने सरसकट कर्जमाफी करून नियमित कर्ज भरणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांना १ लाख रुपयांचे अनुदान द्यायला हवे होते.

​सध्याच्या जागतिक परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, आखाती देशांमधील युद्धामुळे द्राक्ष आणि डाळिंब यांसारख्या फळबागा उत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांच्या जमिनी वाहून गेल्या, परंतु त्यांना अद्यापही कोणतीही ठोस मदत मिळालेली नाही. 

अशा गंभीर प्रश्नांकडे सरकारचे होणारे दुर्लक्ष हे अत्यंत दुर्दैवी असून, हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेली आश्वासनांची खैरात आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा असूनही प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या वेळी त्याला वाऱ्यावर सोडले जात असल्याची भावना थोरात यांनी व्यक्त केली आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !