भोंदूगिरीपासून सावध राहा, संत-ग्रंथ हाच शाश्वत सुखाचा मार्ग - महंत उध्दव महाराज
◻️ नेवासे येथे २१ एप्रिलपासून सद्गुरु नारायणगिरी महाराज सप्ताह
संगमनेर LIVE (नेवासे) | ब्रम्हलीन सद्गुरु नारायणगिरी महाराज यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, नेवासा बुद्रुक येथील सुरेगाव रोडवरील सद्गुरु नारायणगिरी महाराज आश्रमात दि. २१ एप्रिल ते २८ एप्रिल २०२६ या कालावधीत भव्य दिव्य ‘अखंड हरीनाम सप्ताह’ आणि ‘ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी आश्रमाचे प्रमुख महंत उध्दव महाराज मंडलिक (नेवासेकर) यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक उत्साहात संपन्न झाली.
बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना महंत उध्दव महाराज म्हणाले की, आजच्या धावपळीच्या युगात मनुष्याला केवळ धार्मिक उत्सवातूनच खऱ्या सुख-समाधानाची प्राप्ती होऊ शकते. संत विचार आणि ग्रंथांच्या मार्गदर्शनाशिवाय शाश्वत सुखाचा दुसरा कोणताही मार्ग शिल्लक नाही.
यावेळी त्यांनी समाजातील वाढत्या भोंदूगिरीवर कडक प्रहार करत, अशा चुकीचे विचार पेरणाऱ्या लोकांपासून सावध राहून योग्य विचारांच्या माणसांच्या सानिध्यात राहण्याचे आवाहन भाविकांना केले. चांगले विचार समाजासमोर वारंवार सांगत राहणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
या सोहळ्याचे सविस्तर नियोजन विषद करताना महंत उध्दव महाराज यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील वारकरी, भाविक भक्त आणि विशेषतः तरुण पिढीला वारकरी संप्रदायातील विद्वान कीर्तनकारांचे विचार ऐकण्यास मिळावेत, हाच या उत्सवाचा मुख्य हेतू असल्याचे सांगितले.
नियोजीत सप्ताह काळात ह.भ.प. युवराज महाराज देशमुख (आळंदी), ह.भ.प. जयेश महाराज भाग्यवंत (मुंबई), ह.भ.प. देविदास महाराज म्हस्के (शास्त्री), ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली शिंदे (आळंदी), ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकीकर (जळगाव), ह.भ.प. एकनाथ महाराज चत्तर (शास्त्री) आणि ह.भ.प. अनिल महाराज पाटील (बार्शी) यांसारख्या नामवंत कीर्तनकारांची सेवा लाभणार आहे. तसेच नामवंत गायनाचार्य आणि मृदुंगाचार्य यांची कलाही भाविकांना अनुभवता येणार असून सप्ताहाची सांगता २८ एप्रिल रोजी महंत उध्दव महाराज मंडलिक यांच्या काल्याच्या कीर्तनाने होईल.
नेवासा आणि पंचक्रोशीतील भाविकांनी नेहमीच या उत्सवासाठी तन-मन-धनाने सहकार्य करून प्रत्येक उत्सव एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे. समाजाकडून मिळणारे हे प्रेम अवर्णनीय असून, याही वर्षी सर्व स्नेहीजनांनी सहकुटुंब सहभागी होऊन ज्ञानदान व अन्नदान सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आश्रमातर्फे करण्यात आले आहे.
या नियोजन बैठकीप्रसंगी ह.भ.प. कोंडीराम महाराज पेचे, रामकृष्ण कांगुणे, ज्ञानदेव शिंदे, काकासाहेब गायके, सुनिल वाघ, महेश औताडे, प्रा. रमेश शिंदे, आर. एल. नाचण, प्रकाश सोनटक्के आणि काकासाहेब शिंदे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
दरम्यान, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आश्रमाचे शिक्षक बाळासाहेब झिने यांनी केले, तर बैठकीनंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.