संगमनेरच्या पश्चिम भागात वादळी वाऱ्यासह गारपिटीचे तांडव
◻️ आमदार अमोल खताळ यांचे प्रशासनाला तातडीने पंचनाम्यांचे आदेश
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुकसह परिसरातील अनेक गावांमध्ये दुपारनंतर अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह भीषण गारपिटीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत अनेक कुटुंबांच्या डोक्यावरचे छत हिरावले गेले असून, शेतीपिकांचे आणि जनावरांच्या गोठ्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
वादळाचा वेग इतका प्रचंड होता की, धांदरफळ बुद्रुक येथील साठेनगरमधील भास्कर आल्हाट यांच्या घरावरील पत्रे उडून गेले. यामुळे त्यांच्या घरात पावसाचे पाणी शिरून संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. तसेच, डेरेवाडी येथील संजय शिवाजी साबळे यांच्या संपूर्ण घराचे छतच उडाले. या दुर्दैवी घटनेत साबळे यांच्या मुलीच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
संगमनेर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील धांदरफळ, डेरेवाडी, गोडसेवाडी, चिखली, निमज आणि राजापूर या गावांमध्ये गारपिटीने रौद्ररूप धारण केल्यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले असून बळीराजा हवालदिल झाला आहे.
या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत आमदार अमोल खताळ यांनी प्रशासनाला कडक निर्देश दिले आहेत. घटनेची माहिती मिळताच त्यांनी महसूल आणि कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून बाधित भागांना त्वरित भेटी देण्याच्या सूचना केल्या.
“अस्मानी संकटामुळे शेतकरी आणि सामान्य नागरिक अडचणीत सापडला आहे. तहसीलदार आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही दिरंगाई न करता तत्काळ बाधित क्षेत्रांना भेटी द्याव्यात. नुकसानग्रस्त घरे आणि शेतीपिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून शासनाकडे अहवाल सादर करावा, जेणेकरून बाधितांना लवकर मदत मिळेल,” असे आमदार खताळ यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.