पठार भागाची तहान भागवण्यासाठी ‘राजहंस’ सरसावले
◻️ ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली टॅकरद्वारे पाणीपुरवठा
संगमनेर LIVE | संगमनेर तालुका हा भौगोलिकदृष्ट्या विस्तारलेला असून पठार भाग, प्रवरा पट्टा आणि तळेगाव पट्टा अशा तीन विभागांत विभागला गेला आहे. सध्या कडक उन्हाळ्यामुळे पठार भागातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. अशा परिस्थितीत शासकीय मदतीची वाट न पाहता, कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राजहंस दूध संघाने पुढाकार घेऊन पिण्याच्या पाण्याचे टॅकर सुरू केले आहेत. यामुळे दुर्गम भागातील महिला व नागरिकांना मोठा आधार मिळाला आहे.
ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी अनंत अडचणींवर मात करून निळवंडे धरण आणि त्याचे कालवे पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. निळवंडेच्या पाण्यामुळे लाभक्षेत्रातील अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला असला, तरी उंचावर असलेल्या पठार भागातील काही वाड्या-वस्त्यांवर आजही उन्हाळ्यात टंचाई निर्माण होते. यावर शाश्वत उपाय म्हणून थोरात यांनी पायाभूत आखणी करून ठेवली असून, ती मार्गी लावणे आता नव्या सरकारचे काम आहे.
पठार भागातील गुंजाळवाडी, वरुडी, सारोळे आणि डोळासने यांसारख्या गावांमध्ये सध्या पाण्याची भीषण टंचाई आहे. ही गरज ओळखून राजहंस दूध संघाच्या वतीने चार टॅकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे, हे टॅकर ‘येताना पाणी घेऊन येतात आणि जाताना दूध घेऊन जातात’, असा अनोखा आणि कार्यक्षम दिनक्रम सुरू आहे. या उपक्रमामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना दुहेरी दिलासा मिळत आहे.
“संगमनेर तालुका हा केवळ मतदारसंघ नसून एक परिवार आहे,” ही भावना जपणाऱ्या ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी टंचाईच्या काळात नेहमीच जनतेच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली आहे. टॅकर गावात पोहोचताच पाणी भरण्यासाठी महिलांची मोठी गर्दी होत असून, “थोरात साहेबांमुळेच आमची तहान भागली,” अशा भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
दरम्यान राजहंस दूध संघाने सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या या मदतीबद्दल पठार भागातील विविध ग्रामपंचायती आणि नागरिकांनी व्यवस्थापनाचे व बाळासाहेब थोरात यांचे विशेष आभार मानले आहेत.