आमदार अमोल खताळ यांच्याकडून सरसकट पंचनाम्यांचे आदेश

संगमनेर Live
0
आमदार अमोल खताळ यांच्याकडून सरसकट पंचनाम्यांचे आदेश

◻️​ अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची आमदारांकडून प्रत्यक्ष पाहणी

​संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारा आणि भीषण गारपिटीमुळे बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. या नैसर्गिक आपत्तीची गंभीर दखल घेत आमदार अमोल खताळ यांनी सोमवारी (दि. ३०) सकाळी बाधित क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने सरकारी मदत मिळवून देण्यासाठी महसूल आणि कृषी विभागाने कोणताही विलंब न लावता सरसकट पंचनामे पूर्ण करावेत, असे कडक निर्देश त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

​तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक, धांदरफळ खुर्द, डेरेवाडी, गोडसेवाडी, निमज आणि राजापूर या गावांना निसर्गाच्या कोपाचा सर्वाधिक फटका बसला आहे. शेतातील उभा असलेला गहू, कांदा, टोमॅटो, मका आणि विशेषतः डाळिंबाची पिके अक्षरशः आडवी झाली आहेत. गारपिटीचा जोर इतका मोठा होता की, अनेक ठिकाणच्या डाळिंब बागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या असून शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे. पिकांसोबतच वादळी वाऱ्याने जनजीवनावरही मोठा परिणाम केला आहे.

​या नैसर्गिक आपत्तीमध्ये घरांचेही प्रचंड नुकसान झाले असून अनेक कुटुंबांचा निवारा हिरावला गेला आहे. डेरेवाडी येथे संजय शिवाजी साबळे यांच्या घरावरील पत्रे वादळी वाऱ्याने उडून गेल्याने आदिती संजय साबळे ही मुलगी जखमी झाली असून, तिच्यावर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. साठेनगर येथेही अशीच हृदयद्रावक घटना घडली, जिथे भास्कर आल्हाट यांच्या घराचे पत्रे उडत असताना, झोळीत झोपलेल्या लहान मुलीला तिच्या आईने प्रसंगावधान राखून सुरक्षित बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. तसेच वर्षा भिमराज गोर्डे यांचे घर कोसळले असून, निमज येथील महानुभाव पंथाच्या आश्रमाचेही पत्रे उडून मोठे नुकसान झाले आहे.

​शेतकऱ्यांच्या नुकसानीची दाहकता पाहणी दरम्यान स्पष्टपणे जाणवत होती. निमज येथील कृषीभूषण पुरस्कार विजेते तुकाराम गुंजाळ आणि धांदरफळ खुर्द येथील सिंधुबाई देवगिरे यांच्या डाळिंब बागांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर भास्कर कोकणे यांचे टोमॅटो आणि श्यामराव कासार यांच्या गव्हाचे पीक मातीमोल झाले आहे. या पाहणी दौऱ्यात भास्कर आल्हाट यांनी घरकुल योजनेचा लाभ मिळत नसल्याची व्यथा मांडताच, आमदार खताळ यांनी ग्रामपंचायत अधिकारी सुरेश मंडलिक यांना जाब विचारत आल्हाट यांचे नाव तात्काळ घरकुल यादीत समाविष्ट करण्याचे आदेश दिले.

दरम्यान ​या पाहणी दौऱ्यात उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी, तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके, निवासी नायब तहसीलदार सुभाष कदम, ग्रामपंचायत अधिकारी सुरेश मंडलिक आणि राजेश गुंजाळ यांसह महसूल व कृषी विभागाचे अधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार आणि आम्ही खंबीरपणे उभे असून, पंचनाम्याचा अहवाल प्राप्त होताच मदतीसाठी तातडीने पाठपुरावा केला जाईल,” अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी यावेळी दिली.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !