अवकाळीने कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या - बाळासाहेब थोरात
◻️ माजी मंत्री थोरात यांचा बांधावर जात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर
संगमनेर LIVE | रविवारी संगमनेर तालुक्यातील पश्चिम भागाला अवकाळी पावसाने झोडपून काढले. वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून शेती पिकांसह घरांचेही अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तातडीने नुकसानग्रस्त भागाचा दौरा करून बाधितांना दिलासा दिला. “सरकारने कोणत्याही अटी-शर्तीचा फार्स न लावता तातडीने पंचनामे करून भरीव मदत द्यावी,” अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली.
निमज, धांदरफळ खुर्द आणि धांदरफळ बुद्रुक या गावांमध्ये पावसाचा जोर अधिक होता. या भागात प्रामुख्याने डाळिंब, कांदा आणि मका ही पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. मात्र, वादळी पावसामुळे उभी पिके आडवी झाली आहेत. केवळ शेतीच नव्हे, तर जोरदार वाऱ्यामुळे अनेक घरांवरील पत्रे उडून गेली असून घरांची पडझड झाली आहे. काही ठिकाणी जनावरांचे गोठेही जमीनदोस्त झाले आहेत.
नुकसानीची माहिती मिळताच बाळासाहेब थोरात यांनी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले, “भारत हा कृषिप्रधान देश असला तरी शेतकरी कायम निसर्गाच्या आणि दराच्या संकटात असतो. मोठ्या कष्टाने पीक उभे केले असताना अस्मानी संकटामुळे ते वाया गेले आहे. या भागातील डाळिंब, कांदा व मका पिकांचे मोठे नुकसान झाले असून, मी प्रशासकीय यंत्रणेला तात्काळ मदतीच्या आणि पंचनाम्याच्या सूचना दिल्या आहेत.”
पाहणी दौऱ्यादरम्यान धांदरफळ आणि निमज येथील शेतकरी महिलांना झालेल्या नुकसानीमुळे आपले अश्रू आवरता आले नाहीत. उभ्या पिकाचे मातेरे झाल्याचे पाहून त्या भावूक झाल्या होत्या. यावेळी थोरात यांनी या कुटुंबांना धीर देत, काॅग्रेस पक्ष आणि आपण स्वतः त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले.
या अस्मानी संकटामुळे शेतकरी पूर्णपणे कोलमडून गेला असून आता केवळ सरकारी मदतीचाच आधार उरला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना बाळासाहेब थोरात यांनी प्रशासनाकडे महत्त्वाची मागणी केली आहे. महसूल आणि कृषि विभागाने विलंब न लावता प्रत्येक शेताचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत, जेणेकरून कोणावरही अन्याय होणार नाही.
केवळ कागदी घोडे न नाचवता सरकारने बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट आणि भरीव आर्थिक मदत जमा करावी. तसेच, ज्यांची घरे किंवा जनावरांचे गोठे जमीनदोस्त झाले आहेत, त्यांच्यासाठी विशेष नुकसान भरपाई निधी मंजूर करून त्यांना तातडीने सावरण्याची संधी द्यावी, असेही त्यांनी ठामपणे मांडले.
दरम्यान यावेळी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिल झाला असून आता सर्वाच्या नजरा सरकारच्या मदतीकडे लागल्या आहेत.