संगमनेर तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी गारपिटीचा तडाखा

संगमनेर Live
0
संगमनेर तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी गारपिटीचा तडाखा

◻️ निमगाव, मिर्झापूर, नांदुरी दुमाला येथे गहू, कांदा, डाळिंब पिकांचे मोठे नुकसान

​संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील निमज व धांदरफळ परिसराला रविवारी अवकाळी पावसाने झोडपल्यानंतर, सोमवारी सलग दुसऱ्या दिवशीही निसर्गाचा कहर सुरूच राहिला असून संपूर्ण पट्ट्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. 

दुपारी अचानक आलेल्या जोरदार गारपिटीने निमगाव बुद्रुक, निमगाव खुर्द, मेंगाळवाडी, सावरचोळ, पेमगिरी, नांदुरी, सांगवी, वडगाव लांडगा आणि मिर्झापूर परिसरात मोठे नुकसान केले आहे. या निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याची भावना व्यक्त होत आहे. ​गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या अनपेक्षित पावसामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

विशेषतः काढणीला आलेला गहू आणि कांदा या पिकांना मोठा फटका बसला असून, काही ठिकाणी शेतात कापून ठेवलेला तर काही ठिकाणी उभा असलेला गहू पूर्णपणे भिजून मातीमोल झाला आहे. टोमॅटो आणि कांदा पिकामध्ये पाणी साचल्यामुळे ते सडण्याचा मोठा धोका निर्माण झाला असून शेतकऱ्यांचे भांडवलही निघणे कठीण झाले आहे. याशिवाय, नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डाळिंब बागांनाही गारपिटीचा मोठा फटका बसला असून, फळांची मोठ्या प्रमाणावर गळती झाल्याने बागायतदार शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

​आधीच विविध समस्यांनी ग्रासलेल्या बळीराजासमोर या अवकाळी पावसामुळे आता पोटापाण्याचा प्रश्न उभा राहिला आहे. सलग दोन दिवस निसर्गाने दिलेल्या या धक्क्यामुळे संपूर्ण तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर, शासनाने आणि प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ वस्तुनिष्ठ पंचनामे करावे. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !