तुळजापुरात चैत्र पौर्णिमा उत्सवानिमित्त भाविकांसाठी मंदिर संस्थान सज्ज
◻️ सोमवार ३० मार्च ते ३ एप्रिल दरम्यान भरणार चैत्र यात्रोत्सव
संगमनेर LIVE (तुळजापूर) | महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचा चैत्र पौर्णिमा उत्सव यंदा ३० मार्च ते ३ एप्रिल २०२६ या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या यात्रेसाठी महाराष्ट्रासह शेजारील राज्यांतूनही लाखो भाविक तुळजापुरात दाखल होण्याची शक्यता असल्याने मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाने जय्यत तयारी केली आहे. उत्सवाच्या मुख्य काळात म्हणजेच ३१ मार्च, १ एप्रिल आणि २ एप्रिल रोजी देवीची पारंपरिक छबीना मिरवणूक काढण्यात येणार असून १ एप्रिल रोजी देवीचा जोगवा हा मुख्य विधी संपन्न होईल. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता ३१ मार्च ते ५ एप्रिल या कालावधीत सर्व भाविकांना 'बीडकर पायऱ्या' मार्गेच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे.
यंदा उन्हाची तीव्रता अधिक असल्याने भाविकांच्या आरोग्याला प्रशासनाकडून विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. मंदिराकडे येणाऱ्या सर्व प्रमुख मार्गांवर पिण्याच्या पाण्याची चोख व्यवस्था करण्यात आली असून भाविकांना उन्हापासून वाचवण्यासाठी ठिकठिकाणी सावलीची सोय करण्यात आली आहे.
उष्माघात टाळण्यासाठी यंदा भाविकांना नेहमीच्या ओआरएस (ORS) ऐवजी ज्युस टेट्रापॅकचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्य सुविधांच्या दृष्टीने सोलापूर येथील प्रॉक्टो क्लिनिकच्या सहकार्याने प्रथमोपचार पेट्या आणि आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध करून देण्यात आला असून, स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून दर्शन मंडपात पिण्याच्या पाण्याचे वाटप केले जाणार आहे.
दर्शन सुलभ व्हावे आणि गर्दीचे योग्य नियोजन व्हावे यासाठी मंदिर प्रशासनाने काही महत्त्वाचे बदल केले आहेत. ग्रामीण भागातून येणाऱ्या भाविकांच्या मोठ्या संख्येमुळे ३१ मार्च ते ५ एप्रिल या कालावधीत 'रेफरल दर्शन पास' पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत. तसेच ३१ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत ५०० रुपयांचे 'विशेष देणगी दर्शन पास' देखील उपलब्ध नसतील.
या निर्णयामुळे सर्वसामान्य भाविकांना दर्शनासाठी अधिक वेळ आणि संधी मिळण्यास मदत होणार आहे. दर्शनासाठी रांगेत उभे असलेल्या भाविकांच्या सुविधेसाठी दर्शन मंडप आणि मंदिर परिसरात कुलर, फॅन आणि एअर कुलिंग व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली असून गाभाऱ्यातील एअर कुलिंग प्लांटचे सर्व्हिसिंगही पूर्ण झाले आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, बॅग स्कॅनर आणि एक अद्ययावत नियंत्रण कक्ष सज्ज ठेवण्यात आला आहे. भाविकांना मार्गदर्शन करण्यासाठी ठिकठिकाणी डिजिटल फलक आणि अनाउन्समेंट सिस्टीम उभारण्यात आली आहे. आणीबाणीच्या प्रसंगासाठी जनरेटर आणि अग्निशमन यंत्रणाही तैनात असेल. चैत्र यात्रेनिमित्त येणाऱ्या सर्व भाविकांनी स्वतःच्या आरोग्याची व सुरक्षेची काळजी घ्यावी आणि मंदिर परिसरात स्वच्छता राखून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.