पाथरे येथे विजेची तार तुटून गोठ्यावर पडल्यामुळे ९ गाईचा जागीच मृत्यू
◻️ दुर्दैवी घटनेत शेतकऱ्याचे अंदाजे ८ लाखांचे नुकसान
संगमनेर LIVE (सात्रळ) | राहाता तालुक्यातील पाथरे बुद्रुक गावात सोमवारी रात्री काळाने घाला घातला. विजेची तार थेट गोठ्यावर तुटून पडल्याने नऊ लहान-मोठ्या गाईचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या भीषण अपघातात शेतकरी कुटुंबाचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पत्रकार समर्थ वाकचौरे यांनी कळवलेल्या माहितीनुसार, सोमवार (दि. ३०) रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास पाथरे बुद्रुक येथील शेतकरी संजय भास्कर घोलप आणि सोपान लक्ष्मण घोलप यांच्या गोठ्यावर अचानक विजेची तार तुटून पडली. गोठ्यात बांधलेल्या नऊ गाईना याचा जोरदार विद्युत धक्का बसला. हा धक्का इतका भीषण होता की, सर्व नऊ गाईचा जागीच मृत्यू झाला.
या दुर्घटनेत संजय घोलप यांचे अंदाजे ८ ते ८.५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. लेकरांप्रमाणे जीव लावलेल्या जनावरांचा अशा प्रकारे अंत झाल्याने घोलप कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. दूध व्यवसायावर अवलंबून असलेल्या या कुटुंबाचे उत्पन्नाचे साधनच या घटनेमुळे हिरावले गेले आहे.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, विद्युत प्रवाह सुरू असल्याने सुरुवातीला कोणालाही काही करता आले नाही. ग्रामस्थांनी यावेळी तीव्र संताप व्यक्त केला आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ पंचनामा करावा आणि बाधित शेतकऱ्याला जास्तीत जास्त शासकीय मदत मिळवून द्यावी, अशी मागणी पाथरे बुद्रुकच्या ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. असे देखील पत्रकार समर्थ वाकचौरे यांनी कळवले आहे.