अटी-शर्ती विना कर्जमाफी करा, अन्यथा राज्यभर जनआंदोलन छेडू!

संगमनेर Live
0
अटी-शर्ती विना कर्जमाफी करा, अन्यथा राज्यभर जनआंदोलन छेडू!

◻️शेतकरी नेते कॉ. अजित नवले यांचा इशारा 

संगमनेर LIVE (​माजलगाव) | निवडणूक काळात दिलेल्या शब्दाला जागून शेतकऱ्यांची विनाअट आणि सरसकट कर्जमाफी करा, अन्यथा येणाऱ्या काळात सरकारला मोठ्या जनआंदोलनाचा सामना करावा लागेल, असा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (माकप) राज्य सचिव आणि ज्येष्ठ शेतकरी नेते कॉ. अजित नवले यांनी दिला आहे. माजलगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

​कॉम्रेड डॉ. नवले यांनी सत्तेवर असलेल्या युती सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, “निवडणूक प्रचारात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचे आश्‍वासन देऊन हे सरकार सत्तेत आले. मात्र, सत्तेवर आल्यानंतर अटी, शर्ती आणि मर्यादांच्या जाळ्यात अडकवून सरकारने जी घोषणा केली आहे, ती अत्यंत फसवी आहे. शेतकऱ्यांवरील संकटाचे गांभीर्य लक्षात घेऊन कोणत्याही अटीशिवाय सरसकट कर्जमुक्ती जाहीर करणे ही काळाची गरज असून, सरकारने आपली आश्‍वासने पाळली नाहीत तर शेतकरी शांत बसणार नाही.” असा इशारा दिला.

​राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताना त्यांनी सांगितले की, अनेक साखर कारखानदारांनी गेल्या तीन महिन्यांपासून शेतकऱ्यांची ऊस बिले अदा केलेली नाहीत. ही थकीत बिले व्याजासह त्वरित देण्यात यावीत, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच पीक विम्याचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यात सरकार अपयशी ठरत असून, यामुळे बळीराजा दुहेरी संकटात सापडला असल्याचेही त्यांनी नमूद केले.

तसेच ​सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या नाशिकमधील भोंदू बाबा प्रकरणावर बोलताना कॉम्रेड नवले यांनी सरकारमधील काही मंत्री आणि ३९ आमदारांच्या सहभागाचा संशय व्यक्त करत त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली. राज्यातील वाढती गुन्हेगारी, अंधश्रध्दा आणि भोंदूगिरीच्या घटनांना सरकारची दुटप्पी भूमिका जबाबदार असून राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था हे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहखात्याचे अपयश असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली.

दरम्यान, ​माजलगाव येथील या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदेला किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉ. अजय बुरांडे, डीवायएफआय युवक संघटनेचे अध्यक्ष मोहन जाधव, ज्येष्ठ माकप नेते कॉम्रेड मुसद्दीक बाबा, तालुका सचिव कॉम्रेड शिवाजी कुरे, कॉम्रेड कृष्णा सोळंके आणि लहू खारगे यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांचे प्रश्न वेळेत सुटले नाहीत, तर संपूर्ण महाराष्ट्र आंदोलनाने पेटून उठेल, असा खणखणीत इशारा या परिषदेच्या माध्यमातून देण्यात आला असून या संदर्भातील सविस्तर माहिती कॉ. मोहन जाधव यांनी प्रसिध्दीसाठी दिली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !