“एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी”

संगमनेर Live
0
“एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी”

◻️ आमदार अमोल खताळ यांची नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ग्वाही 

​संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यात मागील दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पाऊस आणि भीषण गारपिटीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या संकटाच्या काळात महायुती सरकार आणि स्थानिक प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, बाधित क्षेत्रातील प्रत्येक गुंठ्याचा ‘सरसकट पंचनामा’ करण्याचे स्पष्ट निर्देश आमदार अमोल खताळ यांनी प्रशासनाला दिले आहेत.

​आमदार अमोल खताळ यांनी स्वतः चिखल तुडवत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली. तालुक्यातील धांदरफळ, निमज, राजापूर, चिखली, निमगाव पागा, पेमगिरी, नांदुरी, दुमाला वडगाव, लांडगा, सायखिंडी, मालदाड, घुलेवाडी, गुंजाळवाडी, वेल्हाळे, चिकणी आणि निमगाव भोजापूर या गावांना निसर्गाच्या कोपाचा मोठा फटका बसला आहे. केवळ उभी पिकेच आडवी झाली नाहीत, तर वादळी वाऱ्यामुळे अनेक गरीब शेतकऱ्यांच्या घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर, कृषी आणि महसूल विभागाने अत्यंत पारदर्शकपणे आणि तातडीने हे पंचनामे पूर्ण करावेत, तसेच एकही नुकसानग्रस्त शेतकरी या प्रक्रियेतून सुटणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा कडक सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

​केवळ आपत्ती निवारणच नव्हे, तर संगमनेरच्या सर्वागीण विकासाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठीही आमदार खताळ विधिमंडळात आक्रमक पाहायला मिळत आहेत. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तालुक्याच्या विकासाची प्रभावी मांडणी करण्यात आली असून, महिला व बाल रुग्णालयाचा जिव्हाळ्याचा प्रश्न आता सुटण्याच्या मार्गावर आहे. त्याचप्रमाणे, औद्योगिक विकासासाठी आवश्यक असलेल्या एमआयडीसीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून, लवकरच त्याचे अधिकृत नोटिफिकेशन जाहीर होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

​दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी ‘जलजीवन मिशन’ योजना संगमनेरमध्ये काही ठराविक ठेकेदारांच्या मनमानी आणि संगनमतामुळे अडचणीत आल्याचा आरोप आमदार खताळ यांनी विधानसभेत केला. या योजनेचा पुरता बट्ट्याबोळ झाला असून सामान्य जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याकडे त्यांनी सरकारचे लक्ष वेधले. शासकीय योजनांचा लाभ कागदावर न राहता तो थेट शेवटच्या माणसापर्यत पोहोचावा, यासाठी आपला लढा आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरूच राहील, असा निर्धार त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !