भोंदू अशोक खरातचा शिर्डीत हायप्रोफाईल सावकारीचा पर्दाफाश
◻️ जमीन व्यवहारात कोट्यवधींची फसवणूक; दोघे ताब्यात
संगमनेर LIVE (शिर्डी) | नाशिकमधील स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात आणि त्याच्या पत्नीने शिर्डी परिसरात चालवलेल्या बेकायदेशीर सावकारीचा एक धक्कादायक आणि गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. जमिनीच्या व्यवहारातून पीडित व्यक्तीची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी दोघांना तातडीने अटक करण्यात आली आहे. या कारवाईची सविस्तर माहिती श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.
या प्रकरणाची पार्श्वभूमी पाहता, ऑगस्ट २०२३ पासून अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात आणि त्यांच्या इतर साथीदारांनी शिर्डी, नाशिक आणि राहाता परिसरात जमिनीच्या व्यवहाराचे एक मोठे जाळे विणले होते. एका पीडित व्यक्तीला तातडीच्या पैशांची गरज असताना अशोक खरात याने दरमहा २ टक्के या बेकायदेशीर व्याजदराने रक्कम उपलब्ध करून दिली.
या संपूर्ण व्यवहारादरम्यान आरोपींनी सुमारे २ कोटी ५२ लाख रुपये दिले होते, मात्र त्या बदल्यात विविध मध्यस्थांच्या माध्यमातून व्याजापोटी १ कोटी ६४ लाख रुपये पुन्हा वसूल केले. पीडित व्यक्तीने घेतलेली रक्कम आणि व्याजाचा पूर्ण हिशोब चुकता करण्याची तयारी वारंवार दर्शवूनही, आरोपींनी जाणीवपूर्वक टाळाटाळ केली. याउलट, विश्वासाने गहाण ठेवलेली हक्काची ४ एकर जमीन नावावर करून न देता ती हडपण्याचा प्रयत्न करत पीडिताची मोठी आर्थिक फसवणूक केली.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पीडित व्यक्तीने व्यवहाराचा भाग म्हणून स्वाक्षरी केलेले काही कोरे धनादेश एका आरोपीकडे विश्वासाने ठेवले होते. मात्र, या विश्वासाचा घात करत आरोपींनी त्या धनादेशांचा गैरवापर केला आणि पीडिताच्या बॅक खात्यातील रक्कम परस्पर स्वतःच्या खात्यात वर्ग करून घेतली. अशोक खरात याच्या भोंदूगिरीचा आणि या फसवणुकीचा भांडाफोड झाल्यानंतर पीडिताने हिंमत दाखवून शिर्डी पोलिसांकडे धाव घेतली आणि तक्रार दाखल केली.
दरम्यान, या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२), ३१८(२), ३१८(४) सह महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ च्या कलम ३९ व ४४ अन्वये अशोक खरात, कल्पना खरात, किरण सोनवणे, अरविंद बावके आणि अशोक तांबे यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवून किरण सोनवणे आणि अरविंद बावके या दोघांना ताब्यात घेतले आहे.