पंजाबच्या धर्तीवर संगमनेर राज्यात दुसऱ्या दुग्ध क्रांतीच्या उंबरठ्यावर!

संगमनेर Live
0
पंजाबच्या धर्तीवर संगमनेर राज्यात दुसऱ्या दुग्ध क्रांतीच्या उंबरठ्यावर!

◻️​पंजाब आणि महाराष्ट्र प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर असोसिएशनमध्ये ऐतिहासिक करार

​संगमनेर LIVE | सहकाराच्या माध्यमातून समृध्दीचे मॉडेल उभ्या करणाऱ्या संगमनेर तालुक्यात आता दुग्ध व्यवसायाचे नवे पर्व सुरू झाले आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रणजीतसिंह देशमुख यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या ‘मिशन ५० लिटर’ मोहिमेमुळे महाराष्ट्रात दुसरी दुग्ध क्रांती होईल, असा विश्‍वास पंजाब प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर असोसिएशनचे अध्यक्ष दलजीतसिंग गिल यांनी व्यक्त केला आहे. 

संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने आयोजित १५०० युवा दूध उत्पादकांच्या विशेष कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खुद्द ५० लिटरपेक्षा जास्त दूध देणाऱ्या गायी आणून त्यांच्यातील फरक आणि व्यवस्थापन तंत्र प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगण्यात आले.

​या ऐतिहासिक कार्यशाळेत ‘मिशन ५० लिटर’ मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी पंजाब प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर असोसिएशन व महाराष्ट्र प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर असोसिएशन यांच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे दोन्ही राज्यातील दुग्ध क्षेत्रातील नवनवीन प्रयोग, अनुभव, संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाची देवाणघेवाण होणार असून, त्याचा थेट फायदा स्थानिक शेतकऱ्यांना मिळणार आहे. 

यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी ‘कमी गायी आणि जास्त दूध’ हे नवे सूत्र मांडले. आगामी काळात गोठ्यातील जनावरांची संख्या वाढवण्यापेक्षा प्रत्येक गायीची दूध देण्याची क्षमता कशी वाढवता येईल, यावर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे पंजाबमधील उच्च क्षमतेच्या गायी आणि महाराष्ट्रातील गायींमधील जैविक फरक प्रत्यक्ष व्यासपीठावर गायी आणून समजावून सांगण्यात आला, ज्यामुळे दूध उत्पादकांना व्यवस्थापनातील बारकावे समजणे सोपे झाले.

​“१९७८ पासून आपण पंजाबमधून गायी आणून हा प्रवास सुरू केला. आज संगमनेरची अर्थव्यवस्था दुधामुळे मजबूत आहे. ‘मिशन ५० लिटर’ ही केवळ योजना नसून ती एक चळवळ आहे. स्वच्छ आणि निर्भेळ दूध निर्मिती करून दूध उत्पादकांनी आता ‘दूध उद्योजक’ बनावे.” असे आवाहन ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले.

​“रणजीतसिंह देशमुख २००९ पासून पंजाबच्या संपर्कात आहेत. त्यांनी मुरघास आणि मुक्त संचार गोठ्याची संकल्पना महाराष्ट्रात प्रभावीपणे राबवली. आता ‘मिशन ५० लिटर’ मुळे संगमनेरचा हा पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रासाठी दिशादर्शक ठरेल. या कार्यात पंजाबचे शेतकरी पूर्ण सहकार्य करतील.” अशी ग्वाही दलजीतसिंग गिल यांनी दिली.

रणजितसिंह देशमुख म्हणाले, “सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचा आदर्श वारसा आणि लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील सहकारी संस्था प्रगती करत असून ‘मिशन ५० लिटर’ हा त्यातीलच एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. या उपक्रमांतर्गत ५० लिटर दूध देणाऱ्या गाईची निर्मिती करण्यासाठी पंजाबमधून उच्च वंशावळीच्या कालवडी आणणे किंवा स्थानिक पातळीवर ‘इम्पोर्टेड सॉर्टेड सिमेन’चा प्रभावी वापर करून सात वर्षाच्या कालावधीत तिसरी पिढी तयार करणे, हे प्रमुख उद्दिष्ट आहे. अशा उच्च क्षमतेच्या गाईसाठी चारा, गोठा आणि प्रजनन व्यवस्थापनाची त्रिसूत्री अत्यंत महत्त्वाची असून, यामध्ये मुरघासाची गुणवत्ता तपासणे, ‘काऊ कंफर्ट’ संकल्पनेनुसार गाईना मऊ जागा उपलब्ध करून देणे आणि स्वच्छतेवर भर देणे आवश्यक आहे. दूध उत्पादकांनी आता केवळ पारंपरिक शेती न करता ‘दूध उद्योजक’ बनण्याचे आवाहन करत, रणजीतसिंह देशमुख यांनी सहकारामुळेच 'राजहंस' हा विश्‍वासाचा ब्रॅड निर्माण झाल्याचे आणि सर्वसामान्यांचे जीवन फुलल्याचे नमूद केले.


​या प्रसंगी डॉ. जयश्री थोरात, राजपाल सिंग, सुखदेव सिंग आणि तालुक्यातील हजारो दूध उत्पादक व महिला उपस्थित होत्या. ‘मिशन ५० लिटर’ मोहिमेअंतर्गत उच्च दर्जाची पैदास, आधुनिक गोठा व्यवस्थापन, स्वच्छता आणि मुरघासाचा वापर करून उत्पादन खर्च कमी करणे ही मुख्य उद्दिष्टे ठेवण्यात आली आहेत, जेणेकरून दूध उत्पादक शेतकरी आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होईल. कार्यशाळेचे प्रास्ताविक उदय तिवारी यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. कोमल मस्के यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. प्रमोद पावशे यांनी केले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !